कोलकाता : श्रीलंकेच्या क्रिकेट टीमनं सराव सामन्यामध्ये भारतीय बॉलर्सची धुलाई केली आहे. कोलकाताच्या जाधवपूर विश्वविद्यालयाच्या मैदानात झालेली हा दोन दिवसांचा सराव सामना कोणत्याही निर्णयाविना संपला. श्रीलंकेनं पहिल्या इनिंगमध्ये ९ विकेटच्या मोबदल्यात ४११ रन्स करून डाव घोषित केला. त्यानंतर भारतीय बोर्ड अध्यक्षीय टीमनं पाच विकेट गमावून २८७ रन्स बनवल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेनं पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ८ विकेट गमावून ४११ एवढा स्कोअर केला होता. दुसऱ्या दिवशी एक विकेट गेल्यावर श्रीलंकेनं डाव घोषित केला. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या भारतीय बोर्ड अध्यक्षीय टीमची सुरुवात चांगली झाली नाही. १०० रन्सचा स्कोअर करेपर्यंत टीमनं तीन विकेट  तन्मय अग्रवाल (16), आकाश भंडारी (3) आणि जीवनजोत सिंह (35) गमावल्या होत्या.


त्यानंतर कॅप्टन संजू सॅमसन (128) आणि रोहन प्रेम(39) यांनी ७१ रन्सची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि स्कोअर १७०पर्यंत पोहोचवला. रोहनची विकेट गेल्यावर सॅमसननं संदीप(नाबाद 33) सोबत भागीदारी करून स्कोअर २५५ पर्यंत पोहोचवला आणि सॅमसन आऊट झाला.


सॅमसनची विकेट गेल्यावर संदीपनं सक्सेना (नाबाद 20)बरोबर नाबाद भागीदारी करून भारताचा स्कोअर २८७ रन्सपर्यंत पोहोचवला. या इनिंगमध्ये श्रीलंकेच्या लाहिरु थिरमनेनं दोन विकेट घेतल्या तर दिलरुवान पेरा, धनंजय डी सिल्वा, समाराविक्रमला एक एक विकेट घेण्यात यश आलं.


पहिले बॅटिंग करताना श्रीलंकेच्या सदीरा समाराविक्रम(74), निरोशन डिवेला(नाबाद 73), दिमुथ करुणरत्ने(50), एंजलो मॅथ्यूज(54) यांनी अर्धशतकं झळकावली. भारताच्या संदीप वॉरियर आणि भंडारीनं प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. अवेश खान आणि जलज सक्सेनाला एक-एक विकेट घेता आली.