Pathum Nissanka : श्रीलंकेचा 14 वर्षांचा वनवास संपला! रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडत ठोकली ऐतिहासिक डबल सेंच्यूरी
Pathum Nissanka Double Century : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेत द्विशतक ठोकून श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसांका याने ऐतिहासिक खेळी केली आहे. यावेळी त्याने सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचे रेकॉर्ड उध्वस्त केले.
Sri Lanka vs Afghanistan : श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात पहिला वनडे सामना खेळवला जात आहे. पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका याने ऐतिहासिक कामगिरी करत खणखणीत डबल सेंच्युरी (Pathum Nissanka Double Century) ठोकली आहे. वनडे क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी ठोकणारा निसांका श्रीलंकेचा पहिला आणि जगातील 10 वा फलंदाज ठरला आहे. कारकिर्दीतील 50 व्या एकदिवसीय सामन्यात पथुम निसांका याने ही धमाकेदार कामगिरी केली. 20 फोर आणि 8 सिक्सच्या मदतीने निसांकाने फक्त 139 चेंडूत 210 धावा करत वादळी द्विशतक ठोकलं. त्याच्या या कामगिरीमुळे आता त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) यांचा रेकॉर्ड देखील उध्वस्त केलाय.
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात निसांकाने अफगाणी गोलंदाजांना टप्प्यात घेतलं. प्रथम फलंदाजी करताना अविष्का फर्नांडो आणि पथुम निसांका यांनी धुंवाधार सुरूवात केली. पहिल्या 22 षटकात श्रीलंकेने 150 पार केले होते. दोन्ही सलामीला असलेल्या फलंदाजांनी वादळी खेळी केली. अविष्का फर्नांडो याने 88 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 88 धावा केल्या. त्यानंतर तो बाद झाला मात्र, निसांकाने अफगाणी गोलंदाजांना आस्मान दाखवण्यास सुरूवात केली. कुशल मेंडिस आणि समीरविक्रमा यांनी निसांकाला साथ दिली अन् पठ्ठ्यानं सनथ जयसूर्याचा रेकॉर्ड मोडीस काढला. पथुम निसांकाने सनथा जयसूर्याचा श्रीलंकेसाठी सर्वाधिक वैयक्तिक एकदिवसीय धावसंख्येचा विक्रमही मोडून काढला.
सनथा जयसूर्याचा रेकॉर्ड मोडल्यानंतर 25 वर्षीय निसांका द्विशतक ठोकणार का? असा सवाल विचारला जात होता. अशातच निसांकाने धुंवाधार फलंदाजी करत द्विशतक पूर्ण केलं. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्याच्या डबल सेंच्यूरी ठोकणारा निसांका पहिला फलंदाज बनला आहे.तसेच वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या असलेल्या 7 वा फलंदाज ठरला आहे. तर रोहित शर्माला निसांकाने आठव्या स्थानावर पाठवलंय.
श्रीलंकेचा संघ - पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (C), सदीरा समरविक्रमा, चरित असलंका, जनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, दिलशान मदुशंका, दुष्मंथा चमीरा, प्रमोद मदुशना.
अफगाणिस्तानचा संघ - रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (C), मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, नूर अहमद, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक.