India vs Sri lanka 2nd ODI : भारत आणि श्रीलंका यांच्या खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव झाला आहे. श्रीलंकेने टीम इंडियासमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडिया 208 धावांवर ऑलआऊट झाली. श्रीलंकेने सामना 32 धावांनी जिंकल्याने आता मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. श्रीलंकेचा स्पिनर जेफ्री वेंडरसे याने 6 गडी बाद करत टीम इंडियाला जाळ्यात अडकवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेने दिलेलं आव्हान टीम इंडियासमोर किरकोळ होतं. वर्ल्ड कप फायनलिस्ट टीम इंडिया मात्र लंकेच्या युवा फिरकीपटूसमोर ढेपाळली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 97 धावांची सलामीची पार्टनरशीप झाली असताना टीम इंडियाचा विजय सोपा होता. पण नंतर जेफ्री वेंडरसेच्या फिरकीच्या जाळ्यात टीम इंडियाचे फलंदाज असे काही अडकले की जिंकत आलेला सामना हातातून गमावला. शिवम दुबे, श्रेयस अय्यर, केएल राहुल या मिडल ऑर्डर फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. तर दुबे आणि राहुल यांना भोपळा देखील फोडता आला नाही. अखेर वॉशिंग्टन सुंदरने झुंज दिली. मात्र, ती निष्फळ ठरली. जेफ्री वेंडरसेच्या लेग स्पिनला कोणतीही तोड नव्हती.



जेफ्री वेंडरसेची कमाल


श्रीलंकेचा 34 वर्षीय लेगस्पिनर जेफ्री वँडरसे याने भारताविरुद्ध आपल्या फिरकीचा दम दाखवला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना बाद केल्यानंतर जेफ्रीने भारताच्या धावा आवळल्या आणि धक्क्यावर धक्के दिले. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, शिवम दुबे, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल असे मोठे मासे जेफ्रीच्या गळाला लागले. 97 वर बिनबाद असणाऱ्या टीम इंडियाची परिस्थिती 147 वर 6 गडी बाद अशी झाली. त्यामुळे टीम इंडिया पूर्णपणे बॅकफूटवर आल्याचं दिसून आलं.


टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.


श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.