जय शाह पायउतार होताच आशियाई क्रिकेट परिषदेला मिळाला नवा अध्यक्ष, कोणाला मिळाली जबाबदारी?
ACC New President : जय शाह हे केवळ बीसीसीआयचे सचिवच नाहीत तर आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष देखील होते. मात्र जय शाह आता आयसीसीचे अध्यक्ष झाल्यावर आशियाई क्रिकेट काउन्सिलला आता नवा अध्यक्ष मिळाला आहे.
ACC New President : जय शाह (Jay Shah) यांनी 1 डिसेंबर 2024 पासून आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार हाती घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शहा यांची आयसीसीच्या अध्यक्ष पदासाठी निवड झाली होती. मात्र आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने जय शाह यांचा कार्यकाळ हा 1 डिसेंबर पासून सुरु झाला. आयसीसीचे अध्यक्षपद (ICC President) भूषविणारे जय शाह हे पाचवे भारतीय ठरले आहेत. जय शाह हे केवळ बीसीसीआयचे सचिवच नाहीत तर आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष देखील होते. मात्र जय शाह आता आयसीसीचे अध्यक्ष झाल्यावर आशियाई क्रिकेट काउन्सिलला (Asian Cricket Counsil President) आता नवा अध्यक्ष मिळाला आहे.
कोण आहेत नवे अध्यक्ष?
जय शाह हे मागील 3 वर्षांपासून आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष होते. मात्र आता त्यांच्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी श्रीलंकेचे शम्मी सिल्वा यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. शम्मी सिल्वा हे आयसीसीचे वित्त आणि विपणन समितीचे अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम करत होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे देखील या पदावर विराजमान होण्यासाठी मोठे दावेदार मानले जात होते, परंतु तसे झाले नाही. याचा अर्थ आता आशिया क्रिकेटशी संबंधित प्रत्येक मोठा निर्णय श्रीलंकेचा शम्मी सिल्वा घेणार आहेत. जय शहा यांनी त्यांच्या तीन कार्यकाळात आशियाई क्रिकेट काउन्सिलला नवीन उंचीवर पोहोचवले. त्याच्या नेतृत्वाखाली, आशिया कप 2024-31 साठी विक्रमी व्यावसायिक हक्क विकले गेले, ज्यामुळे ACC ची जागतिक उपस्थिती मजबूत झाली.
कोण होणार बीसीसीआयचे नवे सचिव?
जय शाह हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव सुद्धा होते. आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार जय शाह यांनी स्वीकारल्यावर आता बीसीसीआय देखील नवीन सचिवच्या शोधात आहे. बीसीसीआयच्या सचिव पदासाठी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली, गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पटेल आणि बीसीसीआयचे विद्यमान उपाध्यक्ष राजीव शुक्ला या तिघांची नावं आघाडीवर आहे.
हेही वाचा : बर्थ डे बॉयने वाढदिवसाच्या दिवशी रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा बुमराह जगातील एकमेव
आयसीसी अध्यक्षपद भूषवणारे जय शाह 5 वे भारतीय :
जय शाह यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या भारतीय व्यक्तींनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवलंय होतं. अध्यक्षपदी निवड झालेले जय शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. ऑगस्ट महिन्यात आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु असताना जय शाह यांचे नाव आघाडीवर होते. आयसीसी अध्यक्षपदासाठी एकूण 16 सदस्य मतदान करतात. शहा यांना निवडणूक जिंकण्यासाठी 9 मतांची गरज होती. जय शहा यांच्या बाजूने बहुमतापेक्षा जास्त मतं होती, त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणीही उभं राहण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे अखेर जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.