पाकिस्तानला झटका, श्रीलंकन क्रिकेटर्सने खेळण्यास दिला नकार
पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटची वापसी होण्याच्या प्रक्रियेला झटका लागण्याची शक्यता आहे. श्रीलंकन क्रिकेट टीमच्या प्लेअर्सने लाहोरमध्ये टी-२० सीरिज खेळण्यास नकार दिला आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटची वापसी होण्याच्या प्रक्रियेला झटका लागण्याची शक्यता आहे. श्रीलंकन क्रिकेट टीमच्या प्लेअर्सने लाहोरमध्ये टी-२० सीरिज खेळण्यास नकार दिला आहे.
श्रीलंकन क्रिकेट टीमवर २००९ साली पाकिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अद्याप विसरु शकलेले नाहीयेत. श्रीलंकन क्रिकेटर्सने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला आहे. श्रीलंकन क्रिकेटर्सने मागणी केली आहे की, पाकिस्तान विरोधात खेळण्यात येणाऱ्या तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सीरिजचा तिसरी आणि अंतिम मॅच एखाद्या तठस्थ ठिकाणी आयोजित करण्यात यावी.
दरम्यान, या प्रकरणी क्रिकेट बोर्डाचे अधिकारी श्रीलंकन क्रिकेटर्सचं मन वळविण्यात बिझी आहेत. रिपोर्ट्सच्या मते, श्रीलंकन क्रिकेट (एसएलसी) च्या ४० प्लेयर्सने क्रिकेट बोर्डाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून लाहोरमध्ये न जाण्याचे संकेतही दिले आहेत.
क्रिकबजने एसएलसीच्या सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे की, एसएलसी लवकरच प्लेअर्ससोबत चर्चा करेल. आम्ही त्यांना सीरिज दरम्यान त्रास देण्याची आमची इच्छा नाहीये मात्र, आमच्याकडे कुठलाही पर्याय नाहीये. या प्रकरणी आम्हाला लक्ष द्यायला हवं. आयसीसीही शनिवारी प्लेअर्सला भेटेल आणि लाहोरमधील परिस्थितीसंदर्भात चर्चा करेल.
पाकिस्तानमध्ये गेल्या महिन्यात वर्ल्ड इलेवन क्रिकेट मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये श्रीलंकन ऑलराऊंडर प्लेअर थिसारा परेरा सहभागी झाला होता. तीन मॅचेसच्या टी-२० सीरिजला इंडिपेंडेंस कप नाव देण्यात आलं होतं.