श्रीलंकेचा कर्णधार-प्रशिक्षक आणि व्यवस्थापकाचं निलंबन
श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल, प्रशिक्षक चंदिका हाथुरुसिंघे आणि व्यवस्थापक असंका गुरुसिंघा यांचं ४ वनडे आणि दोन टेस्ट मॅचसाठी निलंबन करण्यात आलं आहे.
मुंबई : श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल, प्रशिक्षक चंदिका हाथुरुसिंघे आणि व्यवस्थापक असंका गुरुसिंघा यांचं ४ वनडे आणि दोन टेस्ट मॅचसाठी निलंबन करण्यात आलं आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उरलेल्या मॅचना हे तिघं मुकणार आहेत. वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. खेळ भावनेला धक्का पोहोचवल्याप्रकरणी हे तिघं दोषी आढळले. मायकल बेलोफ यांनी याप्रकरणाची चौकशी केली होती.
याआधी या तिघांना आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन यांनीही दोषी ठरवलं होतं. मागच्या महिन्यात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सेंट लुशियात झालेल्या टेस्टमध्ये चंडीमलवर बॉलशी छेडछाड केल्याचा आरोप झाला. यानंतर मॅचच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेची टीम मैदानात २ तास उशीरा उतरली.