Sunil Gavaskar Warning To Team India: भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवला लय गवसली. भारताचा मिस्टर 360 डिग्री अशी ओळख असलेला सूर्यकुमार या मालिकेपूर्वी एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना चाचपडत होता. मात्र या मालिकेमध्ये त्याने भन्नाट कामगिरी केली. टी-20 स्पेशलिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावत भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं. त्याने 6 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 72 धावांची खेळी केली. शेवटच्या सामन्यामध्ये सूर्याला छाप पाडता आली नाही. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादव 48 धावांवर बाद झाला. सूर्यकुमारने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये केल्यानंतरही भारताचे माजी फलंदाज आणि विद्यमान समालोचक सुनील गावसकर यांनी सूर्यकुमारवर टीका करतानाच त्याच्यासंदर्भात भारतीय संघाला इशारा दिला आहे.


गावसकर नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतरही सुनील गावसकर त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीवर समाधानी दिसत आहेत. वर्ल्डकपमध्ये अंतिम 11 खेळाडूंमध्ये सूर्यकुमारला संधी देण्यावरुन गावसकर यांनी इशारा दिला आहे. "सूर्यकुमारने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अद्याप कोणतीही मोठी कामगिरी केलेली नाही. तो केवळ शेवटच्या 15 ते 20 ओव्हरमध्ये फलंदाजी करतो. त्यावेळेस तो त्याचं टी-20 मधील कौशल्य वापरतो. अर्थात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मात्र हार्दिक, इशान आणि के. एल. राहुल सुद्धा हे काम करु शकतात. त्यामुळेच सूर्यकुमारला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्याऐवजी श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकांवर निश्चित केलं जावं. सूर्यकुमारला सध्या वाट पहावी लागेल असं दिसतंय. जरी त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली तर त्याला मोठं शतक झळकवावं लागेल. त्याला दाखवून द्यावं लागेल की तो सुद्धा शतक झळकावू शकतो," असं गावसकर म्हणाले.


चौथ्या क्रमांकावर कोण?


वर्ल्डकपआधी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमधून आपली तयारी पूर्ण झाली असल्याचं अधोरेखित केलं आहे. भारताने ही मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली आहे. मात्र या मालिकेमध्ये सूर्यकुमार यादवबरोबरच श्रेयस अय्यरनेही दमदार कामगिरी केली आहे. श्रेयसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धमाकेदार शतक झळकावलं आहे. अय्यरनेही दमदार कामगिरी करत वर्ल्डकपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपला दावा अधिक मजबूत केला आहे. दुखापतीमधून सावरलेल्या श्रेयस अय्यरने दमदार शतक झळकावलं. आता या दोघांपैकी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यायचं हा मोठा प्रश्न कर्णधार रोहित शर्मा समोर असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर गावसकर यांनी आपला कौल श्रेयसच्या बाजूने दिला आहे. 


अंतिम क्षणी भारताने केला बदल


भारताने वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघामध्ये बदल करण्यासाठीच्या शेवटच्या तारखेला फिरकी गोलंदाज आर. अश्वीनला संघात स्थान दिलं. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल जायबंदी असल्याने त्याच्या जागी 15 खेळाडूंमध्ये अश्वीनला संधी देण्यात आली आहे.