मुंबई : युवराज सिंगने २०११ वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे. २०११ वर्ल्ड कपमधल्या धोनीच्या नेतृत्वावरही युवराजने भाष्यं केलं आहे. २०११ वर्ल्ड कपमध्ये सुरेश रैना फॉर्ममध्ये नव्हता, तरी धोनीने त्याला संधी दिली, असं युवराज म्हणाला आहे. कोणत्याही कर्णधाराला एखादा खेळाडू पसंत पडणं हे नेहमीचंच आहे. सुरेश रैनाला धोनीचा पूर्ण पाठिंबा होता, अशी प्रतिक्रिया युवराजने दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'२०११ वर्ल्ड कपमध्ये धोनीला युसुफ पठाण, मी किंवा सुरेश रैना यांच्यातल्या दोघांनाच शेवटच्या ११ खेळाडूंमध्ये संधी द्यावी लागत होती. धोनीसाठी ही गोष्ट डोकेदुखी ठरत होती. सुरेश रैनाला धोनीचं समर्थन होतं. काही मॅचमध्ये धोनीने तिघांना खेळवलं, नंतर मात्र मला आणि रैनाला खेळवण्यात आलं,' असं युवराजने सांगितलं.


'त्यावेळी पठाणही चांगली कामगिरी करत होता आणि मी विकेटही घेत होतो आणि बॅटिंगही चांगली करत होतो. रैना त्यावेळी चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. त्यावेळी टीममध्ये डावखुरा स्पिनर नव्हता आणि मी विकेटही घेत होतो, त्यामुळे माझ्याशिवाय पर्याय नव्हता,' असं वक्तव्य युवराजने केलं.


२००७ टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला ६ बॉलमध्ये ६ सिक्स मारल्यानंतर माझ्या बॅटवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. मॅचनंतर मॅच रेफ्रीनेही माझ्या बॅटचं निरिक्षण केलं, असं युवराजने सांगितलं.


'तुझ्या बॅटला फायबर लावलं आहे का? हे वैध आहे का? असे प्रश्न मला ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकाने विचारले होते. गिलख्रिस्टनेही तुमच्या बॅट कोण बनवतं? असं विचारलं होतं. पण ती बॅट माझ्यासाठी खास होती. त्याआधी बॅटने अशाप्रकारे कधीच खेळलो नव्हतो. ती बॅट आणि २०११ वर्ल्ड कपची बॅट, माझ्यासाठी खास होत्या,' अशी आठवण युवराजने सांगितली.


प्रतीभावान युवा खेळाडू शोधल्याबद्दल युवराजने गांगुलीचं कौतुक केलं आहे. सौरव गांगुली माझा सर्वोत्तम कर्णधार होता. गांगुलीने मला खूप पाठिंबा दिला, असं युवराज म्हणाला.