चेन्नई : चेन्नईच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे. टीमचा दिग्गज बॅट्समन सुरेश रैना पुढच्या दोन मॅच खेळू शकणार नाही. १५ एप्रिलची पंजाबविरुद्धची आणि २० एप्रिलची राजस्थानविरुद्धची मॅच रैनाला खेळता येणार नाही. रैनाला दुखापत झाल्यामुळे तो पुढच्या दोन मॅचमध्ये दिसणार नाही. चेन्नईच्या टीममधून सामना न खेळण्याची रैनाची ही पहिलीच वेळ आहे. याआधी चेन्नईनं खेळलेल्या सगळ्या १३४ मॅचमध्ये रैना खेळला होता. यापैकी ८वेळा चेन्नई प्ले ऑफला गेली होती तर दोन वेळा स्पर्धा जिंकली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये सुनिल नारायणच्या बॉलिंगवर रन काढताना रैनाला दुखापत झाली होती. तीन वर्षानंतर चेन्नई चिंदबरम स्टेडियमवर पहिल्यांदाच मॅच खेळत होती.


चेन्नईला दुखापतीचं ग्रहण


याआधी चेन्नईचा केदार जाधव दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेसाठी बाहेर झाला आहे. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये खेळताना जाधवच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. चेन्नईचा फॅप डुप्लेसिसच्या मांडीचे स्नायू दुखावलेत तसंच त्याचं बोटही फ्रॅक्चर झालं आहे. पण डुप्लेसिस लवकरच मैदानात उतरेल, असा विश्वास चेन्नईचा बॅटिंग कोच माईक हसीनं व्यक्त केला आहे. मुंबईविरुद्धच्या मॅचआधी मुरली विजयच्या बरगड्यांना दुखापत झाली होती, त्यामुळे तोही अजून मैदानात उतरलेला नाही.


चेन्नईचे सामने होणार पुण्यात


चेन्नईमध्ये कावेरी पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे.  त्यामुळे टी-२० स्पर्धेतील चेन्नईचे घरच्या मैदानावर होणारे सामने आता पुण्यात खेळवण्यात येतील. दरम्यान, कावेरी पाणी प्रश्नावरुन मंगळवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामनाही उशिरा सुरु झाला होता. त्याचप्रमाणे रवींद्र जाडेजा आणि फाफ ड्यू प्लेसिसवर मैदानात आंदोलनकर्त्यांनी बूटही फेकून मारला होता. त्यामुळेच आता चेन्नईचे सामाने इतरत्र ठिकाणी हलवण्यात आलेत. दोन वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या चेन्नईला घरच्या मैदानावर क्रिकेटप्रेमींचा मोठा पाठिंबा मिळतो. मात्र, आता चेन्नईच्या पाठिराख्यांना आपल्या टीमसाठी चीअर करण्यासाठी इतर ठिकाणी जावं लागणार आहे.


तामिळनाडूत आंदोलनात हिंसा


तामिळनाडूत सध्या कावेरी प्रश्नावरून उठलेल्या आंदोलनात हिंसा होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मंगळवारी दिवसभर चेन्नईच्या विविध भागात कावेरी पाणी लवादच्या स्थापनेची मागणी करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आली. त्यापैकी एका ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला.