Ind vs Nz Suryakumar Yadav Stunning Catch Video: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान टी-20 (Ind vs Nz T20) मालिकेतील शेवटच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामना 168 धावांनी जिंकला. आधी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीमध्येही भारतीय संघ न्यूझीलंडच्या पाहुण्या संघाहून सरस राहिला. 235 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 66 धावांमध्ये आटोपला. भारताचा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) 63 चेडूंमध्ये 126 धावा करत भारताला 234 धावांपर्यंत मजल मारण्यास मदत केली. त्यानंतर भारतीय संघाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. मात्र यामध्ये भारतीय क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजांना उत्तम साथ दिली. न्यूझीलंडच्या फलंदाजीच्या वेळेस पहिल्या षटकातील चौथ्याच चेंडूवर स्लीपमध्ये सूर्यकुमार यादवने भन्नाट झेल (Suryakumar Yadav Stunning Catch) घेतला. यामुळे न्यूझीलंडचा संघ चार धावांवर असतानाच त्यांचा सलामीवीर फिन अ‍ॅलन तंबूत परतला. सूर्यकुमारचा हा झेल सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिलने नाबाद 126 धावांची खेळी केल्याने भारताने न्यूझीलंडसमोर 235 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र न्यूझीलंडच्या संघाची सुरुवातच अडखळती झाली. हार्दिक पंड्याने टाकलेल्या पहिल्याच षटकामधील चौथ्या चेंडूवर स्लीपवरुन चौकार मारण्याच्या नादात फिन अ‍ॅलनने बाहेर जाणाऱ्या उसळ्या चेंडूला जाणीवपूर्वकपणे बॅट लावली. मात्र स्लीपमध्ये उभ्या असलेल्या सूर्यकुमारने उत्तम टायमिंग साधत अगदी वेळेत हवेत उडी घेत अशक्य वाटणारा झेल घेतला. सूर्यकुमारने घेतलेला झेल पाहून अ‍ॅलनलाही काही क्षण विश्वास बसत नव्हता तर दुसरीकडे भारतीय संघातील खेळाडू ही विकेट सेलिब्रेटही करु लागले होते.



सूर्यकुमारने पंड्याच्या गोलंदाजीवर अ‍ॅलनबरोबरच ग्लेन फिलीपचाही भन्नाट झेल घेतला. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संघाची धावसंख्या 7 वर असताना फिलीपच्या रुपाने न्यूझीलंडचा चौथा गडी तंबूत परतला. या शिवाय सुर्यकुमारने उत्तुंग षटकार मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिचेल सॅटनरचाही बॉण्ड्रीजवळ अगदी भन्नाट झेल टिपला. चेंडू पकडल्यानंतर स्वत: सीमेरेषेपलीकडे जाऊ नये म्हणून सूर्यकुमारने एका पायावर आपल्या शरीराचं संतुलन साधलं. 


नक्की वाचा >> Shubman Gill: विराट, रोहितसारख्या दिग्गजांनाही जमलं नाही ते शुभमनने करुन दाखवलं 


सूर्यकुमारचं क्षेत्ररक्षण पाहून कॅचेस विन मॅचेस या म्हणीची अनेकांना आठवण झाली. सूर्यकुमारने क्षेत्ररक्षणाबरोबर 13 चेडूंमध्ये 24 धावा केल्या. यामध्ये सूर्यकुमारने एक चौकार आणि दोन षटकार लगावले. भारताकडून कर्णधार हार्दिक पंड्याने 16 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद केले. अर्शदीप सिंग, शिवम मावी आणि उमरान मलिकने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारताने या विजयाबरोबरच न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. यापूर्वी भारताने एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्येही असाच पराक्रम करुन दाखवला आहे.