युवराजचा निवड समितीला `इशारा`, टी-20मध्ये अर्धशतक
क्रिकेटपटू युवराज सिंग अनेक दिवसांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे.
नवी दिल्ली : क्रिकेटपटू युवराज सिंग अनेक दिवसांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे. टीममध्ये कमबॅक करण्यासाठी युवराज सिंग जोरदार प्रयत्न करत आहे. प्रथम श्रेणी टी-20 क्रिकेट मुश्ताक अली टूर्नामेंटमध्ये युवराज सिंगनं अर्धशतक झळकवालं आहे. या अर्धशतकाबरोबरच माझ्यातलं क्रिकेट अजूनही बाकी असल्याचा इशारा युवराजनं निवड समितीला दिला आहे.
मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंटमध्ये पंजाबकडून खेळताना युवराज सिंग आणि मनन वोहरानं दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये अर्धशतक केलं. या दोघांच्या अर्धशतकामुळे पंजाबनं दिल्लीचा २ रन्सनी पराभव केला.
दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात झालेल्या या मॅचमध्ये पंजाबनं दिल्लीसमोर १७१ रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण गौतम गंभीरनं केलेल्या ६६ रन्सनंतरही दिल्लीला पराभवाला सामोरं जावं लागलं. २० ओव्हरमध्ये पंजाबनं ४ विकेट्स गमावून १७० रन्स बनवल्या. मनन वोहरानं ५० बॉल्समध्ये ७४ रन्स तर युवराजनं ४० बॉल्समध्ये नाबाद ५० रन्स बनवल्या.
युवराजचं सगळ्यात धीमं अर्धशतक
युवराज सिंगचं टी-20 क्रिकेटमधलं हे सगळ्यात धीमं अर्धशतक आहे. युवराजच्या या इनिंगमध्ये ४ फोर आणि एका सिक्सचा समावेश होता.