मुंबई : टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये आपण मिश्र दुहेरी सामने नेहमीच बघतो. पण फूटबॉल आणि क्रिकेटमध्ये अशाप्रकारे महिला आणि पुरुष एकाच टीममधून खेळताना कधी पाहिलं गेलं नाही. पण आता पुरुष आणि महिला टीमचा एक टी-२० सामना होण्याची शक्यता आहे. भारतीय महिला टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरने असे संकेत दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय महिला टीम मागच्या बऱ्याच कालावधीपासून चांगली कामगिरी करत आहे. पण महिला क्रिकेटपटूंना पुरुष क्रिकेटपटूंएवढं मानधन मिळत नाही. मिताली राजसह अनेक महिला क्रिकेटपटूंनी त्यांच्यासाठीही आयपीएल सुरु करण्यात यावं, अशी मागणी वारंवार केली आहे. बीसीसीआयने मात्र अजूनही याबद्दल निर्णय घेतलेला नाही.


महिलांसाठी आयपीएलसारखी स्पर्धा सुरु होत नसली तरी महिला आणि पुरुष क्रिकेटपटू एकत्र खेळताना दिसू शकतात. हरमनप्रीत कौरने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अशाप्रकारचं आव्हान स्वीकारत असल्याचं हरमनप्रीत म्हणाली आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि मिताली राजदेखील हे आव्हान स्वीकारताना दिसत आहेत.


हरमनप्रीत ट्विटरवर म्हणाली, 'आता वेळ आली आहे खेळाबद्दलचा चुकीचा समज संपवला पाहिजे. याच कारणासाठी @rcgameforlife सोबत हात मिळवत आहे. #ChallengeAccepted. मिश्र टी-२० मॅचसाठी तुमचंही समर्थन द्या.'



या व्हिडिओमध्ये विराटसोबत हरमनप्रीत कौर, मिताली राज आणि वेदा कृष्णमूर्ती दाखवण्यात आल्या आहेत. ही मॅच आयपीएलदरम्यान होणार का यानंतर याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही. आयपीएलमधल्या बंगळुरू टीमच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या मॅचमध्ये आयपीएलमधल्या सगळ्या टीमचे खेळाडू खेळणार का फक्त बंगळुरूच्या टीममधले खेळाडू असणार, याचीही माहिती मिळालेली नाही. या व्हिडिओमध्ये बंगळुरूच्या टीमचे खेळाडू आणि त्यांचे चाहते दिसत आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये फक्त बंगळुरूच्या टीमचेच सदस्य असतील असा अंदाज बांधण्यात येत आहे.