दुबई : T20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव झाला असेल. पण राशिद खानने वैयक्तिकरित्या या सामन्यात इतिहास रचला आहे. राशिदने T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 100 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राशीदच्या आधी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारे तीनच गोलंदाज होते. लसिथ मलिंगा, शकिब अल हसन आणि टिम साउथी हे तीन गोलंदाज आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 100 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये 100 बळी घेणारा राशीद हा जगातील चौथा गोलंदाज ठरलाय.


राशिदने मोडला मलिंगा-शाकिबचा विक्रम


पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात राशीद खानने आपल्या 53व्या सामन्यात मोहम्मद हाफिजला बाद करून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स पूर्ण केल्या. यासह त्याने मलिंगा आणि शाकिबला मागे टाकलंय. लसिथ मलिंगाने 76 आणि टीम सौदीने 82 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळी घेतले होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात राशिद खानने चार ओव्हर्समध्ये 26 धावा देत दोन बळी घेतले. 


आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट्स


आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विचार केला तर हा विक्रम बांगलादेशच्या शाकिब अल हसनच्या नावावर आहे. शाकिबने 94 सामन्यात 117 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान 20 धावांत पाच बळी घेणं ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत लसिथ मलिंगा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 83 टी-20 सामन्यात 107 विकेट घेतल्या. तर राशिद खान 101 विकेट्ससह तिसर्‍या आणि टीम साऊदी 100 विकेटसह चौथ्या क्रमांकावर कायम आहे.