T20 World Cup 2024 : भारतीय क्रिकेट रसिकांसाठी 2023 हे वर्ष काहीसं निराशाजनक ठरलं, कारण या वर्षामध्ये क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या विश्वचषकाचं जेतेपद भारताच्या हातून निसटलं. विजय आमचाच... असं वाटत असतानाच प्रतिस्पर्धी संघानं Team India ला नमवलं. हा पराभव जिव्हारी लागल्यामुळं काही क्रिकेटप्रेमींनी या क्रिकेटपासूनच दुरावा पत्करला. BCCI सुद्धा या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून होतीच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट रसिकांचा एकंदर कल आणि संघातील खेळाडूंची क्षमता या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर आता बीसीसीआयनं अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आगामी T20 World Cup 2024 साठी BCCI च्या वतीनं एका कार्यक्रमादरम्यान भविष्यातील काही गोष्टी अवघ्या 30 सेकंदांमध्ये स्पष्ट करण्यात आल्या. ज्यानंतर रोहित शर्मा आणि त्याच्यासोबतच संघातील इतर खेळाडूंचा चेहरा पाहण्याजोगा होता. 


बीसीसीआयच्या निर्णयानुसार... 


राजकोटमध्ये भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान बीसीसीाय सचिव जय शाह यांनी काही गोष्टी स्पष्ट करत भारतीय क्रिकेट संघाविषयी महत्त्वाचं वक्तव्य केलं. 


'2023 मध्ये अहमदाबाद येथे विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये भारतीय संघाला सलग 10 विजयांनंतर वर्ल्ड कप जिंकता आला नाही, पण त्यांनी मनं जिंकली. मी तुम्हाला आता हमी देतो की, 2024 मध्ये (टी 20 वर्ल्ड कप) रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली नक्की जिंकू', असं शाह म्हणाले. मुळात टी 20 विश्वचषकाचं कर्णधारपद (Rohit Sharma) रोहित शर्माकडेच असेल याची अनेकांना यापूर्वीच कल्पना होती. पण, आता खुद्द बीसीसीआयच्या सचिवांनी त्याबाबत वक्तव्य केल्यामुळं या माहितीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. 



आश्चर्याची बाब म्हणजे जय शाह यांच्या या वक्तव्याच्या वेळी समोर भारतीय क्रिकेट संघासमवेत ज्येष्ठ खेळाडू आणि निवड समितीतील काही मंडळींचीही उपस्थिती होती. ज्यावेळी शाह यांनी टीम इंडियाच्या भविष्यातील कामगिरीवर जोर देत रोहित शर्माच्या कर्णधारपदाविषयी हे वक्तव्य केलं तेव्हा रोहितची प्रतिक्रिया आणि त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. 


यंदाच्या टी20 विश्वचषकाच्या निमित्तानं संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर असेल तर, संघांच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दीक पांड्यावर सोपवण्यात आली आहे.