मुंबई : बहुप्रतिक्षित टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी अर्थात टीम इंडिया (Team India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) आमनेसामने भिडणार आहेत. क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेपेक्षा या हायव्होलटेज सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे. या सामन्यानेच टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात होणार आहे. हा सामना 24 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. हा सामना आम्हीच जिंकू, असा विश्वास पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने व्यक्त केला आहे. (T20 World Cup 2021 Pakistan will beat India says Pakistan captain Babar Azam)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबर काय म्हणाला?


"आम्ही गेल्या 3 वर्षांपासून यूएईत क्रिकेट खेळतोय. त्यामुळे आम्ही तिथल्या परिस्थितीशी एकरुप झालो आहोत. खेळपट्टी कशी असेल तसेच फलंदाजा विरुद्ध कशी रणनिती आखायची, हे आम्हाला चांगलंच ठावूक आहे. सामन्याच्या दिवशी दमदार कामगिरी करणारा संघ जिंकेल. मला वाटतं की आम्हीच जिंकू", असा विश्वास बाबर आझमने व्यक्त केला. तो आयसीसीसोबत बोलत होता. यावेळेस त्याने या हायव्होलटेज सामन्याबाबत प्रतिक्रिया दिली. 


श्रीलंकेचा संघ 2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर होता. यावेळेस श्रीलंकेच्या खेळाडूंवर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून सुरक्षेच्या कारणावरुन इतर संघांनी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला. तेव्हापासून पाकिस्तान टीम अन्य संघाविरुद्ध यूएईमध्ये खेळते. त्यामुळे पाकिस्तानला अन्य संघाच्या तुलनेत यूएईमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा अनुभव आहे. 


आतापर्यंत पाकिस्तानला टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. ही भूतकाळातील घटना असल्याचं आझमचं म्हणनं आहे.


"या अशा सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दबाव असतो. आम्ही हा सामना जिंकून चांगली सुरुवात करु, अशी आशा आहे. स्पर्धेआधी एक टीम म्हणून तुमचा आत्मविश्वास हा महत्त्वाचा भाग असतो. टीम म्हणून आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आम्ही भूतकाळाबाबत नाही, तर भविष्याबाबत विचार करतोय आणि त्या दृष्टीने तयारी करतोय, असंही आझमने स्पष्ट केलं.  


टी 20 वर्ल्ड कपमधील उभयसंघांची कामगिरी


दोन्ही संघ वनडे वर्ल्ड कपमध्ये  7 आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये 5 अशा एकूण 12 वेळा आमनेसामने भिडले आहेत. मात्र पाकिस्तानला एकदाही विजय मिळवता आलेला नाही.   या 5 ही वेळेस टीम इंडिया पाकिस्तावर वरचढ राहिली आहे. 


भारताने पाकिस्तानचा पाचही सामन्यात पराभव केला होता. टी 20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना हे दोन्ही 14 सप्टेंबर 2007 ला भिडले होते. हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर बॉल आऊट द्वारे सामना निकाली काढण्यात आला. या बॉलआऊटमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं.  


टी 20 वर्ल्ड कपसाठी सुधारित टीम इंडिया :  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी. 
 
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल.  


पाकिस्तान : बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आसिफ अली, सोहैब मसूद, सरफराज अहमद (विकेटकीपर), हैदर अली, फखर जमान, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन अफरीदी, हॅरिस रौफ, हसन अली आणि इमाद वसीम. 


रिजर्व प्लेअर : उस्मान कादीर, शाहनवाज दहानी आणि  खुशदिल शाह.