T20 WC : पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे बंद? टीम इंडिया कशी मारणार मजल? काय आहे गणित...
भारताच्या पराभवामुळे सेमीफायनलचं गणित पुन्हा एकदा बिघडलंय.
मुंबई : यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला अखेर पहिल्या पराभवाची चव चाखावीच लागली आहे. आज दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात 5 विकेट्सने भारताचा पराभव झाला. या सामन्याच टीम इंडियाने आफ्रिकन टीमला विजयासाठी 134 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. हे लक्ष्य आफ्रिकेने 2 बॉल बाकी असताना पूर्ण केलं. मात्र या पराभवामुळे सेमीफायनलचं गणित पुन्हा एकदा बिघडलंय.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवानंतर ग्रुप 2 च्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झालाय. आता दक्षिण आफ्रिकेची टीम तीन मॅचमध्ये 2 विजय आणि एक पावसामुळे रद्द झाल्याने पॉईंट्सटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर टीम इंडिया दोन विजय आणि एक पराभवासह दुसऱ्या क्रमांकावर घसरलीये. दक्षिण आफ्रिकेचे पाच आणि भारताचे चार गुण आहेत.
बांगलादेश ग्रुप-2 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या टीमने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकलेत. मुख्य म्हणजे बांग्लादेशचे पॉईंट्सही 4 आहेत मात्र रनरेट वजा असल्याने त्यांचा क्रमांक तिसरा आहे. झिम्बाब्वेची टीम चौथ्या क्रमांकावर तर पाकिस्तान पाचव्या आणि नेदरलँड सहाव्या स्थानावर आहे.
पाकिस्तान वर्ल्डकपबाहेर?
भारताच्या पराभवानंतर आता पाकिस्तानच्या टीमसमोर अडचणी निर्माण झाल्यात. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पुढील सामन्यात पाकिस्तानला हरवलं बाबर ब्रिगेड वर्ल्डकपमधून बाहेर पडेल. पाकिस्तानने जरी दक्षिण आफ्रिकेला हरवलं तरीही त्यांचा पुढील रस्ता कठीण असणार आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेला नेदरलँडशीही खेळावं लागणार आहे. अशा स्थितीत आफ्रिकेच्या टीमने शेवटचा सामना जिंकल्यास त्याचे 7 पॉईंट्स होतील. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला पराभूत करून पाकिस्तान केवळ 6 पॉईंट्सपर्यंत पोहोचू शकते.
भारताला पुढील दोन मॅच जिंकणं गरजेचं
नेदरलँड्सने त्यांचे तीन्ही सामने गमावले असून ती सेमीफायनल फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलीये. आता सेमीफायनल गाठायची असेल तर भारताला पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील. 1 सामना जिंकूनही टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते, पण त्यानंतर नेट-रन रेटचा मुद्दाही उपस्थित होऊ शकतो. भारताला आता बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचंय.