भारत सेटींग लावून T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, इंझमामचा गंभीर आरोप; म्हणाला, `पाकिस्तानला कधीच..`
T20 World Cup 2024 Inzamam ul Haq Comment: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या स्पर्धेत एकही सामना पराभूत न होता फायनलला पोहोचला आहे. असं असतानाच आता इंझमामने वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
T20 World Cup 2024 Inzamam ul Haq Comment: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंडला पराभूत करुन भारताने 10 वर्षानंतर टी-20 वर्ल्ड कपची फायनल गाठली आहे. मात्र एकीकडे भारतीय संघ फायनलमध्ये प्रवेश करत असतानाच दुसरीकडे भारतीय संघ सेटींग लावून फायनलमध्ये पोहचल्याचा सूर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने लावला आहे. भारतीय संघावर तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर इंझमामने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या टाइम टेबलवरुन इंझमामने टीका केली आहे. भारतीय संघ बॉल टॅम्परिंग करतो असे बिनबुडाचे आरोप केल्यानंतर आता इंझमामने वर्ल्ड कपच्या वेळापत्रकावरुन टीका करताना भारतीय संघ कुठे सेमी-फायनल खेळणार हे स्पर्धा सुरु व्हायच्या आधीच ठरवलं होतं असा दावा इंझमामने केला आहे. इंझमामने हा अन्याय असल्याचं म्हटलं आहे. तसेच पाकिस्तानला असा फायदा कधीच झाला नसल्याचंही तो म्हणालाय आहे. इंझमामने भारतीय संघावर टीका करताना, भारताच्या सेमी-फायनलसाठी राखीव दिवस नसणं हे भारताच्या दृष्टीने फायद्याचं आणि सोयीस्कर ठरेल असेच नियोजन करण्यात आल्याचाही आरोप केला आहे.
इंझमामने नेमके कोणते आरोप केले?
पाकिस्तानमधील '24 न्यूज' या वृत्तवाहिनीवरील 'हंगामा' या कार्यक्रमामध्ये इंझमामने, "तुम्ही दोन्ही सेमी-फायनल पाहिल्यात तर केवळ भारत आणि इंग्लंडच्या सामन्यासाठी राखीव दिवस नसल्याचं लक्षात येईल. हे यासाठी करण्यात आलं आहे कारण भारत त्यांचे सर्व सामने जिंकला आहे. सामना रद्द झाला तर भारतीय संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र होईल, असे नियोजन करण्यात आलेले आहे," असा आरोप केला आहे.
नक्की पाहा हा व्हिडीओ >> 'आपको अपना दिमाग...', रोहित शर्मा इंझमामवर भडकला; बॉल टॅम्परिंगच्या आरोपांवरुन झापलं
"प्रत्येक सामन्यासाठी वेगळे नियम आहेत," असा आरोप इंझमाने केला आहे. "आशिया चषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा संघ भक्कम स्थितीत असताना अचानक एकाच सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला," असं म्हणत इंझमामने आपली नाराजी व्यक्त केली. भारतीय संघाला फायद्याची ठरेल अशी भूमिका दरवेळेस सोयीस्करपणे घेतली जात असल्याचा आरोपही इंझमामने केला.
नक्की वाचा >> विराटला डच्चू? T20 World Cup फायनलसाठी संघात स्थान नाही? रोहित स्पष्टच म्हणाला, 'त्याचा फॉर्म आमच्यासाठी..'
भारतासमोर कोणाचंही काही चालत नाही
"जागतिक क्रिकेटमध्ये भारताकडे सध्या एवढी शक्ती आहे की त्यांच्यासमोर इंग्लंडही काही करु शकत नाही. क्रिकेट सध्या केवळ एकाच्याच रेट्याने चालवलं जात आहे. आता क्रिकेटमध्ये बीग थ्री असं काहीही राहिलेलं नसून केवळ बीग वन असं समिकरण झालं आहे," अशी टीका इंझमामने केली आहे.
नक्की वाचा >> 'तो विराटसारख्या...'; रोहितचं कौतुक करताना कपिल देवकडून कोहलीला खोचक टोला
बीसीसीआयकडील पैशांचा परिणाम?
इंझमामने केलेल्या आरोपांनंतर बोलताना या कार्यक्रमाच्या अँकरने बीसीसीआयकडे असलेल्या आर्थिक ताकदीचा हा परिणाम असल्याचं विधान केलं. तसेच प्रामाणिक निर्णय घेताना हा पैशांचा घटक महत्त्वाचा ठरु नये तसेच निर्णयासाठी या एकमेव घटकाचा विचार केला जाऊ नये असंही या अँकरने म्हटलं.