T20 World Cup 2024 Rohit Sharma After Beating Pakistan: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या टीममधील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताने जिंकल्यानंतर रोहितने संघाच्या जिद्दीचं कौतुक केलं आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतील भारताचा दुसरा सामना न्यूयॉर्कमधील नासो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना अगदीच लो स्कोरिंग सामना राहिला. मात्र भारताने या सामन्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केल्याचा विक्रम नावावर नोंदवला. 


सामन्यात नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाची मधली फळी या सामन्यात पूर्णपणे कोलमडली. भारताचा डाव 19 ओव्हरमध्ये 119 धावांवर आटोपला. भारतीय फलंदाजांपैकी केवळ ऋषभ पंतने 42 धावांची खेळी करत कडवी झुंज दिली. पंतने 31 बॉलमध्ये 42 धावा केल्या. एवढ्या कमी धावसंख्येचा पाठलाग करतानाही पाकिस्तानी संघाची सामना संपता संपता तारांबळ उडाली. धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघ हा सामना जिंकणार असं वाटत होतं. अगदी 48 बॉलमध्ये 48 धावा हव्या असताना पाकिस्तानच्या हाती 8 विकेट्स होत्या. मात्र भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी दमदार पुनरागमन केलं. या दोघांनी केलेल्या अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानी संघ खेळपट्टीवर टीकलाच नाही. बुमराहने 14 धावा देत 3 तर हार्दिकने 24 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. भारताप्रमाणे पाकिस्तानचाही डाव गडगडला आणि त्यांना 20 षटकांमध्ये 113 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने हा सामना 6 रनांनी जिंकला. 


सामन्यानंतर रोहित काय म्हणाला?


सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये कर्णधार रोहित शर्माने सर्वच भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं. खास करुन त्याने बुमराहचं कौतुक केलं. तणावाखाली खेळाडूंनी संयम राखला आणि एकत्रित कामगिरी उंचावली असं रोहित म्हणाला. कमी धावसंख्या आणि आव्हानात्मक परिस्थिती असतानाही भारतीय संघाने विजय मिळवल्याबद्दल मला माझ्या संघाचा अभिमान वाटतो, असंही रोहित म्हणाला.


नक्की वाचा >> T20 World Cup Ind vs Pak: 'गर्विष्ठ आणि बेजबाबदारपणे..', गावसकर टीम इंडियावर संतापले


आपल्याबरोबर घडू शकतं तर...


"आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. पहिल्या 10 ओव्हरनंतर आम्ही उत्तम स्थितीमध्ये होते. पार्टनरशीप होतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं घडलं नाही. आम्ही अपेक्षेपेक्षा 15 ते 20 धावा कमी केल्या. या खेळपट्टीवर प्रत्येक धाव महत्त्वाची होती. आम्ही 140 च्या आसपासची धावसंख्या गाठण्याच्या प्रयत्नात होतो. मात्र हरकत नाही आमच्या गोलंदाजांनी आम्हाला जिंकवून दिलं. यापूर्वी आम्ही जो सामना खेळला त्यापेक्षा आज खेळपट्टी बरी होती. संघातील नेव्हर से डाय (कधीही हार न मानण्याचा) भूमिका आमच्या कामी आली. केवळ 119 धावा करुन आम्हाला सुरुवातीला विकेट्स घेणं महत्त्वाचं होतं आणि आम्ही ते केलं. मात्र दुसऱ्या डाव्यात अर्ध्याहून अधिक सामना संपल्यानंतर आपल्याबरोबर असं (फलंदाजांची भंबेरी उडणे) घडू शकतं तर त्यांच्याबरोबरही घडू शकतं. आमच्यापैकी प्रत्येकाने दिलेलं थोडं थोडं योगदान कामी आलं," असं रोहित सामन्यानंतर संवाद साधताना म्हणाला.


नक्की वाचा >> शाहिनने बुमराहच्या लेकाला काय गिफ्ट दिलं? संजना गणेशनने केला खुलासा


बुमराहबद्दल काय म्हणाला रोहित?


भारताला सामना जिंकवून देण्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोलाची भूमिका बजावली. सामन्यानंतर बुमराहबद्दल आपण फार काही बोलणार नाही असं रोहित म्हणाला. "ज्याच्या हाती बॉल देण्यात आला त्यांना सामन्यावर प्रभाव पाडायचा होता, अशी स्थिती होती. बुमराहने पूर्ण क्षमतेनं गोलंदाजी केली. मी त्याच्याबद्दल फारसं बोलणार नाही. तो वर्ल्ड कप संपेपर्यंत अशाच मानसिकतेमध्ये राहावा, अशी आमची इच्छा आहे. तो गोलंदाजीसंदर्भात फारच हुशार आहे. येथील प्रेक्षकही फार उत्तम होते. त्यांनी आम्हाला कधीच निराश होऊ दिलं नाही. आम्ही जगात कुठेही खेळायला गेलो तरी ते मोठ्या संख्येनं आम्हाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहतात. ते आज हसत त्यांच्या घरी जातील. ही केवळ स्पर्धेची सुरुवात आहे. अजून फार दूरपर्यंत जायचं आहे," असं म्हणत रोहितने प्रेक्षकांचेही आभार मानले.