`रोहित तसेच विराटच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहतो तेव्हा...`; वर्ल्ड कपचा उल्लेख करत गांगुलीचं विधान
T20 World Cup 2024 Sourav Ganguly Blunt Remark: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी तसेच भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीच्या पत्नीचाही उल्लेख करत सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात केलेलं विधान चर्चेत.
T20 World Cup 2024 Sourav Ganguly Blunt Remark: अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप सुरु झाला आहे. मात्र या स्पर्धेदरम्यान भारतीय क्रिकेटपटूंवरील मानसिक दबाव हा अधिक असणार आहे. कारण आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सातत्याने येणारं अपयश आणि ट्रफीचा दुष्काळ संपवण्याचं आव्हान भारतीय संघासमोर आले. क्रिकेट हा भारतामधील सर्वात आवडीने पाहिला जाणारा खेळ असल्याने कोट्यवधी चाहते या सामन्यांवर नजर ठेऊन असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीने प्रशिक्षक राहुल द्रविडसहीत भारतीय संघ व्यवस्थापनाला टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये यश मिळवायचं असेल तर स्पर्धेकडे अधिक रिलॅक्सपणे पाहण्याची आणि तशाच पद्धतीने परिस्थिती हाताळण्याची गरज आहे असं म्हटलं आहे.
राहुल द्रविडला सल्ला
सौरवने 'रिव्हस्पोर्ट्स'शी बोलताना भारतीय संघ फार जास्त प्रयत्न घेऊन स्वत:ला अपेक्षेच्या दबावाखाली टाकतो असं मत व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे हा दावा करताना सौरवने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पत्नीकडे पाहिल्यावर हे फार प्राकर्षाने जाणवतं असंही म्हटलं आहे. "मला जर राहुल द्रविडला काही सांगायचं असेल तर इतकं सांगेन की थोडा रिलॅक्स दृष्टीकोन ठेवा. खरं तर तो फार हुशार आणि क्रिकेटची जाण असणारा क्रिकेटपटू, प्रशिक्षक आहे तरी मी हा सल्ला देईन," असं सौरव म्हणाला.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पत्नीचा उल्लेख
पुढे बोलताना सौरव गांगुलने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहिल्यानंतर त्या किती तणावात आहेत हे सहज दिसून येतं, असंही गांगुली म्हणाला. "मी जेव्हा रोहित शर्माच्या पत्नीला प्रेक्षकांच्या स्टॅण्डमध्ये (मैदानात) पाहतो तेव्हा ती किती तणावाखाली असते हे जाणवतं. मी जेव्हा विराटच्या पत्नीला पाहतो तेव्हा ती किती तणावात आहे हे सुद्धा प्राकर्षाने जाणवतं. आपण भारतात हीच चूक करतो की आपण फार जास्त ताण घेऊन गोष्टींकडे पाहतो," असं गांगुली म्हणाला. या दोघींनीही त्यांच्या पतीकडून चाहत्यांना असलेल्या अपेक्षांमुळे टेन्शन आलेलं असतं असं सौरव गांगुलीचा सूचित करायचं आहे.
नक्की पाहा >> T20 World Cup आधी भारतीय स्टार क्रिकेटरने गुपचूप उरकलं लग्न; पाहा Photos, पत्नी दिसायला फारच सुंदर
2003 च्या वर्ल्ड कपचा केला उल्लेख
पुढे बोलातना गांगुलीने, "मला वाटतं की याचं उदाहरण सांगायचं झालं तर 2003 च्या (वर्ल्ड कपच्या) अंतिम सामन्याचा उल्लेख करता येईल. मोठे सामने खेळताना आपण काही करु शकत असू तर ते इतकेच आहे की आपण रिलॅक्स होऊन पूर्ण स्वातंत्र्याने खेळलं पाहिजे," असंही म्हटलं. 2003 च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. तिथे ऑस्ट्रेलियन संघाने भारताला पराभूत केलं होतं. त्या सामन्यामध्ये भारतीय संघ अधिक रिलॅक्स राहिला असता तर अधिक उत्तम कामगिरी झाली असती असं गांगुली म्हणाला.
नक्की वाचा >> T20 World Cup: '..आणि हसत राहा', दमदार खेळीनंतर बॅड पॅचबद्दल हार्दिकचं सूचक विधान! 5 शब्दांची कॅप्शनही चर्चेत
फायनल हरलो तरी मी म्हणेन की, भारत सर्वोत्तम संघ होता
"2003 च्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामना आम्ही पराभूत झालो असलो तरी मी असं म्हणेन की भारत त्या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ होता. आम्ही संपूर्ण स्पर्धेत उत्तम खेळ केला. आम्ही अंतिम सामन्यात थोडे अधिक रिलॅक्स असलो असतो तर निकाल वेगळाही लागला असता. मला तेच यंदा हवं आहे की संघाने रिलॅक्स रहावं. खेळाडूंनी मुक्तपणे खेळावं मात्र असं करताना स्वत:वर फार ताण आणून नये," अशी अपेक्षा गांगुलीने व्यक्त केली.