T20 World Cup Champion Meet PM Modi : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेचा चुरशीच्या लढतीत सात धावांनी मात करत ट्ऱॉफीवर नाव कोरलं. या विजयानंतर टीम इंडियाचं मायदेशात जल्लोषात स्वागत झालं. टीम इंडियाने दिल्लीत दाखल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी खेळाडूंबरोबर ऐतिहासिक विजयावर मनसोक्त गप्पा मारल्या. पीएम मोदी आणि खेळाडूंमध्ये नेमक्या काय गप्पा रंगल्या याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. गप्पांदरम्यान पीएम मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना (Team India Meet PM Modi) मजेशीर प्रश्नही विचारले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कर्णधार रोहित शर्माला एक प्रश्न विचारला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती कल्पना कोणाची?
करोडो भारतीय क्रिकेट प्रेमींना ज्या प्रश्नाच्या उत्तराची उत्सुकता होती, तो प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी रोहित शर्माला विचारला. स्लो मोशन वॉक करत ट्रॉफ उचलण्याची कल्पना कोणाची होती, असा प्रश्न रोहित शर्माला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रोहित शर्माने याचं श्रेय टीम इंडियातल्या दोन खेळाडूंना दिलं.स्लो मोशन वॉकची कल्पना संघातील कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी दिल्याचं रोहित शर्माने सांगितलं. ट्रॉफी घेताना काही तरी हटके करावं असं या दोघांनी आपल्याला सूचवल्याचा खुलासा रोहित शर्माने केला.


खेळपट्टीवरची माती का खाल्ली?
अंतिम सामन्यातील विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने खेळपट्टीवरच्या मातीचे कण खात आभार व्यक्त केले. याबद्दलही पंतप्रधान मोदी यांनी हिटमॅनला विचारणा केली. यावर बोलताना रोहित शर्माने सांगितलं, आम्ही अनेक वर्षांनी ट्रॉफी जिंकली, या क्षणाची आम्ही सर्वांना यासाठी खूप वाट पाहिली होती, अनेकवेळा वर्ल्ड कपच्या जवळ पोहोचूनही जिंकता आलं नव्हतं, पण अखेर तो क्षण अनुभवता आला. ज्या खेळपट्टीवर आम्ही विजय मिळवला, तो क्षण कायमचा लक्षात राहावा यासाठी आपण खेळपट्टीवरची माती खाल्याचं रोहित शर्माने सांगितलं.


खेळाडूंबरोबर मनसोक्त गप्पा
कर्णधार रोहित शर्माव्यतिरिक्त पीएम मोदी यांनी टीम इंडियातल्या इतर खेळाडूंशीही गप्पा मारल्या. खेळाडूंबरोबरच यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही उपस्थित होते. 



पंतप्रधानांनी ट्ऱॉफीला लावला नाही हात
या कार्यक्रमात एक गोष्ट सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरली.  टीम इंडियातल्या खेळाडूंनी ट्ऱॉफीसह पंतप्रधान मोदी यांच्यासह फोटो काढला. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पीएम मोदी यांच्यासह ट्रॉफी धरली. पण मोदी यांनी ट्रॉफीला हात लावला नाही. ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळाडूंनी मेहनत केली, त्यांच्या मान राखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ट्रॉफीला हात लावला नाही. पंतप्रधानांच्या या कृतीचं कौतुक केलं जात आहे.