T20 World Cup : जून महिन्यता अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. आयपीएलमध्ये (IPL 2024) खेळणाऱ्या इंग्लंडच्या जवळपास सर्वच खेळाडूंची संघात निवड करण्यात आली आहे. इंग्लंड संघाचं नेतृत्व जोस बटलरकडे (Jos Buttler) सोपवण्यात आलं आहे. विशेष म्हणेज तब्बल 13 महिन्यांनंतर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची इंग्लंडच्या संघात निवड झाली आहे. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर क्रिकेटपासून दूर होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

13 महिन्यानंतर जोफ्रा आर्चरचं कमबॅक
जोफ्रा आर्चर हाताच्या कोपऱ्याच्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. दुखापतीतून सावरण्यासाठी जोफ्रा आर्चरला तब्बल एक वर्ष लागलं. अजूनही तो पूर्णपणे तंदरुस्त झालेला नाही. जोफ्रा इंग्लंडसाठी आपला शेवटचा सामना 2023 मध्ये खेळला होता. जोफ्रा आर्चरप्रमाणेच ख्रिस जॉर्डनही मोठ्या कालावधीनंतर इंग्लंड संघात परतला आहे. 2023 च्या सप्टेंबर महिन्यात जॉर्डन आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.


इंग्लंडची मजबूत फलंदाजी
इंग्लंडच्या संघाची सर्वात जमेची बाजू आहे ती त्यांची फलंदाजी. इंग्लंड संघातील सर्व फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. इंग्लंड संघात ज्या फलंदाजांची वर्णी लागली आहे ते सर्व फलंदाज आयपीएल 2024 मध्ये धावांचा पाऊस पाडतायत. जोस बटलर, विल जॅक्स, फिल साल्ट, जॉनी बेअरस्टो आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा करतायत. हे सर्व फलंदाज इंग्लंडच्या टॉप ऑर्डरमध्ये असणार आहेत. 


फिल साल्टने आयपीएलमध्ये  9 सामन्यात 398 धावा केल्यात आहेत. जोस बटलरने 8 सामन्यात 319 धावा केल्यात. जॉनी बेअरस्टोने 7 सामन्यात 204 धावा केल्यात. विल जॅक्सने आयपीएलमध्ये उशीरा एन्ट्री मारली. पण अवघ्या 5 सामन्यात त्याच्या नावावर 176 धावा जमा झाल्यात. ऑलराऊंडर सॅम करनने 9 सामन्यात 152 धावा केल्यात. याशिवाय हॅरी ब्रूक, लायम लिविंग्स्टन, मोईन अली देखील तळाला फलंदाजी करण्यात माहिर आहेत.


भेदक गोलंदाजी
इंग्लंड संघात मोईन अली आणि सॅम करन हे अष्टपैलू खेळाडू आहेत. तर जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. आदिल रशीद आणि टॉम हार्टलेवर इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजीची मदार असेल.


T20 वर्ल्ड कप 2024 साठी इंग्लंडचा संघ
जॉस बटलर (कर्णधार), मोइन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टली, विल जॅक्स, क्रिस जॉर्डन, लायम लिविंगस्टन, आदिल रशीद, फिल साल्ट, रीस टॉपली, मार्क वुड