T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी पुढच्या 48 तासात टीम इंडियाची (Team India) घोषणा केली जाईल. टी20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआय (BCCI) 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा करेल. पण त्याआधी टीम इंडियात एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. टीम इंडियाची धुरा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) असणार हे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं आहे. पण मीडिया रिपोर्सनुसार टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात नव्या उपकर्णधारपदाची वर्णी लागू शकते. म्हणजेच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) पत्ता कट होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याला डच्चू
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार टीम इंडियाच्या उपकर्णधारपदावरुन हार्दिक पांड्याची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2024 मधल्या कामगिरीच्या आधारे टी20 वर्ल्ड कपसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी इतर खेळाडूंच्या तुलनेत फारशी चांगली झालेली नाही. गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याने नऊ सामन्यात केवळ पाच विकेट घेतल्या आहेत. यासाठी त्याने तब्बल 180 धावांची खैरात केलीय. तर फलंदाजीत हार्दिक पांड्याने नऊ सामन्यात 197 धावा केल्यात. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने खेळलेल्या नऊ सामन्यात हार्दिकला एकही अर्धशतक करता आलेलं नाही. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 46 आहे. 


टीम इंडियात नवा उपकर्णधार
रिपोर्टनुसार हार्दिक पांड्याच्या जागी ऋषभ पंतची (Rishabh Pant) वर्णी लागू शकते. अपघातानंतर तब्बल 14 महिन्यांनी मैदानावर उतरणाऱ्या ऋषभ पंतच्या कामगिरीवर क्रिकेट जगताचं लक्ष होतं. ऋषभ पंतनेही आपल्या चाहत्यांना निराश होऊ दिलं नाही. आयपीएलमध्ये पंतने धमाकेदार पुनरागमन केलंय. आयपीएलमधल्या जबरदस्त कामगिरीने पंतने बीसीसीआय निवड समितीला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. पंतने अकरा सामन्यात तब्बल 398 धावा केल्यात. नाबाद 88 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. याशिवया स्टम्पच्या मागेही पंत चपळाई दाखवतोय. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपसाठी पंतची निवड जवळपास निश्चित आहे, याशिवाय त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही दिली जाऊ शकते.


पंत उपकर्णधार झाल्यास टीम इंडियाला फायदा?
ऋषभ पंत टीम इंडियाचा उपकर्णधार होण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचं वय कमी आहे, म्हणजे तो मोठा काळ टीम इंडियासाठी खेळू शकतो. शिवाय तो आता पूर्ण पणे फिट आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद सांभाळताना पंतने संघाच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे नेतृत्व करण्याचा अनुभवही त्याच्या गाठिशी आहे. याऊलट हार्दिक पांड्या सध्या आऊट ऑफ आहे, आणि दुखापतीमुळे तो वारंवार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असतो.