दिनेश कार्तिकने वाढवली चुरस, टी20 वर्ल्ड कपसाठी `हे` 5 विकेटकिपर दावेदार
Team India for T20 World Cup 2024 : आयपीएलनंतर जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे दोन देश या स्पर्धेचे यजमान असणार आहेत. टी20 वर्ल्ड कपसाठी 30 एप्रिल किंवा 1 मेला टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Team India for T20 World Cup 2024 : देशात सध्या इंडियन प्रीमिअर लीगची (IPL 2024) धूम सुरु आहे. 26 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे 4 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. आयपीएलमधल्या कामगिरीच्या जोरावर खेळाडूंची निवड केली जाणार असल्याचं बीसीसीआय (BCCI) निवड समितीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे खेळाडूंकडे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आयपीएल महत्त्वाची ठरणार आहे.
विकेटकिपरसाठी जोरदार चुरस
टीम इंडियात सर्वात जास्त चुरस आहे ती विकेटकिपरसाठी. पंधरा खेळाडूंच्या संघात दोन विकेटकिपर निवडताना बीसीसीआय निवड समितीलचा कस लागणार आहे. टीम इंडियात विकेटकिपिंगसाठी एक-दोन नाही तर तब्बल पाच खेळाडू दावेदार आहेत. यात ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, ईशान किशन आणि दिनेश कार्तिकचा समावेश आहे. हे पाचही जण आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळतायत, पण विशेष म्हणजे या पाचही जणांची कामगिरी दमदार होतेय.
संजू सॅमसनची कामगिरी
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि विकेटकिपर अशी दुहेरी भूमिका संजू सॅमसन बजावतोय. आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात संजू सॅमसनने 264 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 अर्धशतकं केलीत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे 82. टीम इंडियात संजू विकेटकिपरसाठी मोठा दावेदार आहे.
दिनेश कार्तिक बेस्ट फिनिशर
38 वर्षांच्या दिनेश कार्तिकने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीकडून खेळताना दिनेश कार्तिकने अवघ्या 35 चेंडूत 83 धावांची खेळी केली होती. याआधी कार्तिकने मुंबईविरुद्ध 23 चेंडूत 53 धावा ठोकल्या होत्या. पण या दोन्ही सामन्यात बंगळुरुला पराभव पत्करावा लागला होता. कार्तिकने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात 226 धावा केल्यात. बेस्ट फिनिशर म्हणून कार्तिककडे पाहिलं जातं. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपसाठी निवड समितीचं त्याच्यावर लक्ष असेल.
पंतची आयपीएलमध्ये धमाल
30 डिसेंबर 2022 ला एका कार अपघतात ऋषभ पंतच्या पायाला जबर मार बसला. त्यानंतर तब्बल 14 महिन्यांच्या उपचारानंतर पंत मैदानावर परतला. आपल्या दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना पंतने दमदार कमबॅक केला. सहा सामन्यात पंतने 194 धावा केल्या. यात त्याने 2 अर्धशतकं लगावली. त्याचा स्ट्राईक रेटही 157.72 इतका आहे.
केएल राहुलचं नाणंही खणखणीत
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आणि विकेटकिपर केएल राहुलचं नाणंही खणखणीत आहे. राहुलने यंदाच्या आयपीएलमध्ये सहा सामन्यात 204 धावा केल्यात. यात एका अर्धशतकी खेळीचा समावेशआहे. त्याचा स्ट्राईक रेट 138.77 आहे. यामुळे राहुलची दावेदारी थोडी कमकुवत आहे.
ईशान किशनला संधी मिळणार?
संजू सॅमसन आणि ऋषभ पंतसमोर ईशान किशनचं पारडं थोडं कमी आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या ईशान किशनने यंदाच्या आयपीएमध्ये अद्याप लौकीकाला साजेशी कामगिरी केलेली नाही. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर ईशानने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात केवळ 184 धावा केल्यात. यात त्याने एक अर्धशतक केलंय.