`भारताला T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर..`; विराटचा उल्लेख करत संतापले कृष्णामाचारी श्रीकांत
T20 World Cup Rumour: मागील काही काळापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील निवड समितीच्या सूत्रांच्या हवाल्याने एक बातमी क्रिकेट विश्वामध्ये चर्चेत आहे. याच बातमीवरुन भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला आहे.
T20 World Cup Rumour: एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2019 स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीला यंदाच्या वर्षी होत असलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या संघात स्थान मिळणार नाही अशी चर्चा आहे. विराट कोहली मागील 14 महिन्यांपासून केवळ 2 टी-20 सामने खेळला आहे. त्यामुळेच त्याचं सिलेक्शन होणार नाही अशी चर्चा आहे. या चर्चेदरम्यानच भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णामाचारी श्रीकांत यांनी विराटची निवड होण्याची शक्यता कमी असल्याच्या कथित दाव्याच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं आहे.
विराटचा विचार होणार नाही अशी चर्चा
विराट फारच कमी टी-20 सामने खेळल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती 2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी त्याचा विचार करणार नाही अशी चर्चा आहे. मात्र कृष्णामाचारी श्रीकांत यांनी भारताला ही स्पर्धा जिंकायची असेल तर संघात विराट कोहली असणं फारच आवश्यक आहे, असं म्हटलं आहे. भारताच्या या माजी कर्णधाराने बिनबुडाच्या अफवा पसरवणाऱ्यांनाही झापलं आहे.
जराही शक्यता वाटत नाही
"अशी थोडीही शक्यता मला वाटत नाही की भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीशिवाय सहभागी होईल. त्यानेच आपल्याला 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात पोहचवलं होतं. तो त्यावेळी मालिकावीर होता," असं कृष्णामाचारी श्रीकांत यांनी म्हटलं आहे. श्रीकांत एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी, "हे असले (विराटला संघातून डच्चू दिला जाईल असे) दावे कोण करत आहे? अशा अफवा पसरवणाऱ्यांना इतर काही काम नाही का? कशाच्या जोरावर हे असले दावे केला जातात?" असं म्हणत आपला संताप व्यक्त केला.
...तर विराट हवाच
"भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर विराट कोहली संघामध्ये हवाच," असं कृष्णामाचारी श्रीकांत यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर म्हटलं आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर विराट एकही टी-20 सामना खेळलेला नाही. विराट कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमधूनही खासगी कारण देत माघार घेतली होती. विराट आता 22 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघामधून आयपीएल खेळताना दिसणार आहे. मात्र असं असलं तरी विराटचा टी-20 वर्ल्ड कपच्या संघासाठी विचार केला जाणार नाही असा दावा बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने मागील काही काळात समोर आलेल्या बातम्यांमध्ये करण्यात आला आहे.
विराटशिवाय संघ जाऊच शकत नाही
मात्र हे दावे कृष्णामाचारी श्रीकांत यांना फारसे ठोस वाटत नाही. "मैदानात टिकून राहणारा खेळाडू तुम्हाला संघात हवा. टी-20 वर्ल्ड कप असो किंवा एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्ड कप असो डावाला आकार देणारा महत्त्वाचा खेळाडू संघात हवाच. विराट कोहलीशिवाय भारतीय संघ या स्पर्धेसाठी रवाना होऊ शकत नाही. आपल्याला 100 टक्के विराटची संघात गरज आहेच," असं कृष्णामाचारी श्रीकांत यांनी म्हटलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विराटने उत्तम कामगिरी केली तर तो टी-20 वर्ल्ड कपमध्येही दमदार कामगिरी करेल असा विश्वास कृष्णामाचारी श्रीकांत यांनी व्यक्त केला आहे.
हे लोक घेऊ शकतात विराटची जागा
सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, तिलक वर्मा, शिवम दुबे यासारखे नव्या दमाचे खेळाडू भारतीय संघातील मधल्या फळीत दिसतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे खेळाडू विराटची जागा घेतील असंही सांगितलं जात आहे.