`अशा गोष्टी शमीला...`, इंझमामला कार्टून म्हटल्याने पाकचा माजी कॅप्टन संतापून म्हणाला, `यावर रोहितने...`
Pakistan Ex Captain Slams Mohammed Shami: मोहम्मद शमीने त्याच्याबद्दल 2023 च्या वर्ल्ड कपदरम्यान करण्यात आलेल्या विधानावरुन इंझमाम-उल-हकला झापल्यानंतर पाकिस्तानातून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Pakistan Ex Captain Slams Mohammed Shami: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने माजी पाकिस्तानी कर्णधार इंझमाम-उल-हकने केलेल्या विचित्र दाव्यांवरुन त्याला थेट कार्टून म्हणत टीका केली आहे. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शमीने ही टीका केल्यानंतर आता पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने शमीवर निशाणा साधत, हे असलं बोलणं शमीला शोभत नाही असा टोला लगावला आहे. इंझमामने शमीने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये बॉलमध्ये फेरफार करुन तो वळवण्यास भाग पाडला होता, असा दावा केलेला. यावरुनच शमीने इंझमामची लाज काढल्यानंतर आता पाकिस्तानमधून या प्रतिक्रियेवर पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे.
शमी काय म्हणाला?
शुभांकर मिश्रा या युट्यूबरच्या 'अनप्लग्ड' या कार्यक्रमातील मुलाखतीमध्ये शमीला इंझमाम-उल-हकने केलेल्या बॉल टॅम्परींगच्या आरोपासंदर्भात विचारण्यात आलं. इंझमाम-उल-हकने 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही शमीने डिजीटल बॉलचा वापर करुन चेंडू वळवल्याचा आरोप इंझमाम-उल-हकने केलेला. यावर उत्तर देताना शमीने, "ते (पाकिस्तानी) आपल्याबद्दल कधीच समाधानी नसतात आणि यापुढेही नसतील. मला वर्ल्ड कपमध्ये वेगळा बॉल देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मी एका मुलाखतीमध्येही हे सांगितलं की मी तो बॉल घरी ठेवला आहे. माझ्याकडे प्लेअर ऑफ द मॅचसाठी दिलेला बॉल आहे. कदाचित एखाद्या दिवशी मी तो बॉल कापून त्यामध्ये मशीन आहे की नाही ते दाखवेन," अशी उपहासात्मक प्रतिक्रिया नोंदवली. "आता त्यांनी अर्शदीप सिंगने चेंडू कसा वळवला यासंदर्भात रंजक प्रतिक्रिया नोंदवली आहे. खरं तर त्यांच्याविरुद्ध जो खेळाडू चांगली कामगिरी करतो त्याला ते लक्ष्य करतात," असं शमी म्हणाला. एवढ्यावरच न थांबता शमीने, "या असल्या कार्टूनगिरीच्या प्रतिक्रिया इतर कुठे तरी द्याव्यात. ते लोकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहेत," अशा शब्दांमध्ये शमीने इंझमाम-उल-हकची लाजच काढल्याचं पाहायला मिळालं.
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने साधला निशाणा
पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान भट्टने शमीवर याच टीकेवरुन निशाणा साधला आहे. शमीने केलेल्या विधानामुळे आपण दुखावलो गेलो आहोत असं सांगताना सलमान भट्टने शमीकडून इंझमामसंदर्भात करण्यात आलेली विधानं ही कंबरेखालील होती असं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'कार्ल्सनने मला 6 बॉलमध्ये 24 धावा मारल्यावर रोहित जवळ आला अन् म्हणाला...'; अक्षर पटेलचा खुलासा
काय म्हणाला पाकिस्तानचा माजी कर्णधार शमीवर टीका करताना
"हो त्यावरुन वाद झाला होता, जो टाळता आला असता. अनेक लोकांनी विधान केली. इंझमामही काहीतरी म्हणाला होता. यावर रोहित शर्माने स्पष्टीकरण दिल्यानंतर विषय संपला होता. मात्र केवळ नातेवाईक असल्याने खेळाडूंना संघात स्थान दिलं जातं असं म्हणणं फार वाईट (Dirty Hit) आहे. अशा गोष्टी मोहम्मद शमीला शोभत नाहीत. तो फार प्रसिद्ध गोलंदाज आहे. त्याच पद्धतीने इंझमाम हा प्रसिद्ध कर्णधार होता," अशी आठवण सलमान भट्टने करुन दिली.
नक्की वाचा >> 'हिंमत असेल तर..', सानियाबरोबरच्या लग्नासंदर्भातील प्रश्नावर मोहम्मद शमी भडकला; म्हणाला, 'कोणाच्या तरी..'
पाकिस्तानी संघालाही दिला सल्ला...
युट्यूबवरुन आपलं मत मांडताना सलमानने, पाकिस्तानने नात्यांवर आणि मैत्रीवर आधारित संघ निवडून नये असा सल्लाही स्वत:च्या संघाला दिला आहे. "मोहम्मद शमीने इंझमाम-उल-हकला लक्ष्य करत काही वक्तव्य केली. पाकिस्तानी संघ हा वैयक्तिक नात्यांच्या आधारे निवडला जातो असं शमी इंझमामवर टीका करताना म्हणाला. मला वाटतं हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे कारण तुम्ही इमाल-उल-हकची आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर तो कामगिरीच्या आधारे पाकिस्तानी संघात आला. शमीने केलेली विधानं ही कंबरेखालील आहेत. त्याने असं बोलायला नको होतं," असं सलमान भट्टने म्हटलं आहे.