मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये पराभव झाल्यानंतर आता भारतीय टीमवर माजी क्रिकेटपटूंकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनं भारतीय टीम व्यवस्थापनावर निशाणा साधला आहे. लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेकडे योग्य पद्धतीनं लक्ष देण्यात आलं नसल्याचा आरोप गांगुलीनं केला आहे. गांगुलीचं हे वक्तव्य म्हणजे कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्यावर टीका असल्याचं बोललं जात आहे. भारतीय टीम सध्या शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर प्रमाणापेक्षा जास्त अवलंबून आहे. मधल्या फळीमध्ये सारखे प्रयोग केल्यामुळे भारतीय टीमचं नुकसान होत आहे, असं गांगुली म्हणाला.


राहुलला वगळल्यामुळे टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये लोकेश राहुलला टीममधून वगळण्यात आलं. यावरही गांगुलीनं टीका केली. राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे तरी त्याला संधी देण्यात आली नाही. मी डोळे बंद करतो तेव्हा मला चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करताना राहुल दिसतो. तुमचे सुरुवातीचे ४ खेळाडू सर्वश्रेष्ठ असले पाहिजेत आणि तुम्हाला त्या खेळाडूंसोबतच राहिलं पाहिजे. आम्ही तुला १५ मॅच देतो, जा आणि खेळ असं राहुलला सांगितलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली.


तुम्ही खेळाडू तयार करणार नाही


भारतीय टीम व्यवस्थापन खेळाडूंना म्हणावी तशी संधी देत नाही. राहुलनं टी-२०मध्ये शतक केलं आणि त्याला बाहेर ठेवण्यात आलं. अशाप्रकारे तुम्ही खेळाडूंना तयार करू शकत नाही. रहाणेसोबतही असंच झालं. हे दोन्ही तुमचे सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहेत. तुमच्याकडे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर भक्कम बॅट्समन असला पाहिजे. यानंतर सहाव्या क्रमांकासाठी तुम्ही धोनी किंवा दिनेश कार्तिकपैकी एकाला संधी देऊ शकतात. सातव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या खेळेल, असं गांगुली म्हणाला.


रैनाबद्दल विचार करण्याची गरज


आता भारताला सुरेश रैनाबद्दल विचार करण्याची गरज आहे. रैनाविषयी मला आदर आहे पण त्याच्यापेक्षा चांगले खेळाडू आहेत. रैना भरपूर वेळ खेळला आहे. त्यानं वनडेमध्ये रन केल्या आहेत पण परदेशामध्ये त्याला रन बनवता आल्या नाहीत. भारताला आता रैनाच्या पुढे विचार करावा लागेल, असं वक्तव्य गांगुलीनं केलं.