पिंक बॉल समोर टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मारली बाजी
IND VS AUS 2nd Test : टीम इंडियाकडून फलंदाजीसाठी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांची जोडी मैदानात आली. यावेळी मिचेल स्टार्कने यशस्वी जयस्वालची विकेट घेतली.
IND VS AUS 2nd Test : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून येथे ते 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळत आहेत. टेस्ट सीरिजचा दुसरा सामना हा शुक्रवार 6 डिसेंबर पासून एडिलेड येथे सुरु झाला. यात सामन्याच्या पहिल्या दिवशी पिंक बॉल समोर टीम इंडियाची (Team India) टीम ढेपाळली आणि अवघ्या 180 धावांवर ऑल आउट झाली. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाअंती 1 विकेट गमावून 86 धावा केल्या, त्यामुळे टीम इंडिया सध्या 94 धावांनी आघाडीवर आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमधील पर्थ येथे झालेला पहिला सामना जिंकून टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच प्लेईंग 11 मध्ये 3 मोठे बदल केले यानुसार रोहितने देवदत्त पड्डीकल, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेलला बेंचवर बसवलं तर आर अश्विन, शुभमन गिल आणि स्वतः रोहित इत्यादींचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला.
पहिल्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाला धक्का :
टीम इंडियाकडून फलंदाजीसाठी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांची जोडी मैदानात आली. यावेळी मिचेल स्टार्कने यशस्वी जयस्वालची विकेट घेतली. त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीलाच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांना देखील सिंगल डिजिट धावांवर बाद करण्यात ऑस्ट्रेलिया यशस्वी झाली. टीम इंडियाकडून ऋषभ पंत (22) , केएल राहुल (37) , शुभमन गिल (31), नितीश रेड्डी (42), अश्विन (22) इत्यादी वगळता इतर कोणत्याही फलंदाजाने दोन अंकी धांव संख्या केली नाही. त्यामुळे टीम इंडिया 44.1 ओव्हर खेळून 180 धावांवर ऑल आउट झाली. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक 6 धावा घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि बोलंड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?
जसप्रीत बुमराहने वाढदिवशी रचला इतिहास :
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना हा एडिलेड येथे खेळवला जात असून यात ऑस्ट्रेलियाची इनिंग सुरु असताना जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट घेतली. बुमराहने 35 बॉलमध्ये 13 धावा केलेल्या उस्मान ख्वाजाला बाद केले. 11 व्या ओव्हरला टाकलेल्या शेवटच्या बॉलवर उस्मान ख्वाजाने मारलेला बॉलचा कॅच रोहित शर्माने पकडला आणि बुमराहला पहिली विकेट मिळाली. बुमराह टेस्ट क्रिकेटमध्ये 2024 मध्ये 50 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. याबाबतीत आर अश्विन याने 46 विकेट्स घेतल्या असून तिसऱ्या क्रमांकावर 45 विकेट्स घेणारा शोएब बशीर आहे तर रवींद्र जडेजाच्या नावावर 44 विकेट्स आहेत. बुमराहने 2024 या वर्षात आतापर्यंत 11 टेस्ट सामने खेळले यात त्याने तब्बल 50 विकेट्स घेतल्या. फलंदाजी करताना पहिल्या दिवसाअंती ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 13 धावा केल्या. तर नॅथन मॅकस्विनीने 38 आणि मार्नस लॅबुशेनने 20 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसा अखेरीस 1 विकेट गमावून 86 धावा केल्या.