Icc Test Rankingमध्ये अव्वल क्रमांकावर, टीम इंडियाने 5 वर्षात परदेशात किती कसोटी सामने जिंकलेत?
टीम इंडिया सलग 5 वर्षांपासून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे.
मुंबई : टीम इंडिया लवकरच इंग्लंड दौऱ्यावर (India Tour England 2021) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम (World Test Champiponship) सामन्यात भिडणार आहे. भारतीय संघाने 2 वर्ष चाललेल्या या स्पर्धेत अनेक संघांना पछाडत अंतिम सामन्यात धडक मारली. आयसीसीच्या (ICC) या स्पर्धेला 2019 पासून सुरुवात झाली. गेल्या काही काळापासून सातत्याने रंगतदार कसोटी मालिका पाहायला मिळत आहेत. यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमित 2 वेळा मालिका पराभव केला. यासह विविध संघांनी परदेशात जाऊन यजमान संघाला पराभवाची धूळ चारली. यामध्ये इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंडचाही समावेश आहे. या निमित्ताने कोणत्या संघाने मागील 5 वर्षात परदेशात सर्वाधिक सामने जिंकले आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
टीम इंडिया अव्वल क्रमांकावर
टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 5 वर्षात परदेशात सर्वाधिक सामने जिंकले आहेत. भारताने परदेशात 32 सामने खेळले आहेत. यापैकी 15 मॅचमध्ये भारताने प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवला आहे. या दरम्यान भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 वेळा मालिका जिंकण्याचा कारनामा केला आहे. तर वेस्टइंडिज आणि श्रीलंकेचाही कसोटी मालिकेत पराभव केला आहे. तसेच न्यूझीलंडचा अपवाद वगळता भारताने प्रत्येत ठिकाणी किमान एका सामन्यात विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ही कामगिरी विराट कोहलीच्या नेतृत्वात केली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर कोण?
इंग्लंड सर्वाधिक सामन्यांमध्ये विजयाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने परदेशात 39 सामन्यांपैकी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या तुलनेत इंग्लंडने 7 सामने अधिक खेळले आहेत. इंग्लंडने दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचा त्यांच्याच घरात त्यांचा मालिका पराभव केला आहे. तर इंग्रजांना भारतात केवळ एकच सामना जिंकता आला आहे.
कांगारु तिसऱ्या स्थानी
ऑस्ट्रेलियाने मागील 5 वर्षात परदेशात 27 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना 11 सामने जिंकण्यात यश मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाने भारत, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामने जिंकले आहेत.
पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर
भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि शेजारी असलेल्या पाकिस्तानने 32 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी पाकिस्तानने 11 सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं आहे. या दरम्यान पाकिस्तानने झिम्बाब्वेचा कसोटी मालिकेत पराभव केला आहे. तर इंग्लंड आणि वेस्टइंडिज मध्येही पाकिस्तानने सामने जिंकले आहेत.