मुंबई : टीम इंडियाचा (Team India)  स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारवर (Bhuvneshwar Kumar) दुखाचा डोंगर कोसळला आहे. भुवनेश्वर कुमारचे व़डील किरण पाल सिंह यांचं कॅन्सरमुळे निधन झालं आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर नुकतेच दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र त्यांची कॅन्सर विरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. किरण पाल सिंह हे उत्तर प्रदेश पोलिसात कार्यरत होते. (team india bowler bhuvneshwar kumar father kiran pal singh mavi passed away due to cancer)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरण पाल यांना कॅन्सरसह अनेक आजार होते. त्यांच्यावर  काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना मेरठमधील राहत्या घरी आणण्यात आले. मात्र आज त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत जगाचा निरोप घेतला. अखेरच्या क्षणी त्यांच्यासोबत मुलगा भुवनेश्वर, मुलगी रेखा आणि त्यांची पत्नी इंद्रेश देवी उपस्थित होत्या.  


2015 मध्ये जीवे मारण्याची धमकी 


किरण पाल यांना  2015 मध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळेस भुवनेश्वर श्रीलंका दौऱ्यावर होता. जमिन विक्रीच्या वादातून त्यांना धमकी देणअयात आली होती. यानंतर सर्व परिवाराला मेरठ पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. 


भुवनेश्वर श्रीलंका दौऱ्यावर जाणार?


वडिलांच्या निधनामुळे भुवनेश्वर श्रीलंका दौऱ्यावर जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे.


अनेक खेळाडूंना पितृशोक


दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये अनेक क्रिकेटपटूंच्या वडिलांचं निधन झालं आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंह यांच्या वडिलांचे 12 मे ला निधन झाले. त्याआधी फिरकीपटू पीयूष चावलाच्या वडीलांचा 10 मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. तर आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळणाऱ्या चेतन साकरियाच्या वडिलांनाही 9 मे जगाचा निरोप घेतला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती.