सिडनी : कर्णधार विराट कोहलीची टीम गुरुवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध जेव्हा शेवटचा टेस्ट सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा सगळ्यांचा एकच प्रयत्न असेल तो म्हणजे विजयाचा. पण मनात ७० वर्षानंतर इतिहास रचण्याचा विचार देखील असेल. ३० वर्षीय विराटच्या नेतृत्वात भारतीय टीम २०१९ या नव्या वर्षाची सुरुवात एक इतिहास रचून करु शकते. भारताने १९४७-४८ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. पाच सामन्यांच्या या टेस्ट सिरीजमध्ये भारताचा ०-४ ने पराभव झाला होता. भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये ११ सिरीज खेळल्या आहेत. पण एकही सिरीज भारताला जिंकता आली नाही. ११ पैकी ३ सिरीज ड्रॉ झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीम चार टेस्ट सामन्य़ांच्या या सीरीजमध्ये २-१ ने पुढे आहे. बार्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी भारताला सिडनी टेस्ट कोणत्याही परिस्थिती जिंकावी लागेल. या मैदानावर झालेल्या ११ सामन्यांमध्ये भारताने एकमेव सामना १९७८ मध्ये जिंकला होता.


जगातील नंबर १ बॅट्समन असलेल्या विराटच्या टीमने जर ही सिरीज जिंकली तर तो एक इतिहास रचणार आहे. शिवाय परदेशात जावून सामने जिंकणाऱ्या टीममध्ये ही भारतीय टीम सर्वश्रेष्ठ ठरेल. भारतीय टीमला परदेशात अनेकदा पराभवामुळे टीका सहन करावी लागली आहे. २०१८ मध्ये भारताने परदेशात एकही टेस्ट जिंकलेली नाही. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये देखील भारताच्या बॅट्समनने नाराज केलं होतं. 


१३ सदस्यांच्या भारतीय टीममध्ये हार्दिक पांड्याला जागा मिळालेली नाही. मेलबर्न टेस्टमध्ये चांगली कामगिरी करणारा इशांत शर्माला सिडनी टेस्टमध्ये आराम देण्यात आला आहे. त्याच्या जागी उमेश यादवची वापसी झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यादा कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ जानेवारीला चौथा आणि शेवटचा सामना रंगणार आहे. सिडनीमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय टीम सीरीजमध्ये २-१ ने पुढे आहे.


सिडनी टेस्टसाठी भारतीय टीम : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के एल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव.