क्रिकेटपटूंनाही दीदींच्या जाण्याचं दु:ख...पाहा काय केलं...
टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे सिरीजमधीव पहिल्या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी लता मंगेशकर यांना काळी पट्टी बांधून श्रद्धांजली वाहिलीये.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. कोरोना आणि न्यूमोनियामुळे 8 जानेवारी रोजी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र काल पुन्हा त्यांच्या प्रकृती बिघडली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. राजीव शुक्ला म्हणाले, "टीम इंडियाचे सर्व खेळाडू लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हातावर काळी पट्टी बांधतील. शिवाय राष्ट्रध्वजंही अर्धा उतरवण्यात येणार आहे.
लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळी निधन झालं. दीदींच्या जाण्यानं फक्त भारतच नाही आता सारं जग हळहळताना दिसत आहे. देशोदेशीचे दिग्गज दीदींना श्रद्धांजली वाहत आहेत.
लता मंगेशकर या 92 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली. लता मंगेशकर यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.