विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा २०३ रननी दणदणीत विजय झाला आहे. भारताने ठेवलेल्या ३९५ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १९१ रनवर ऑलआऊट झाला. मोहम्मद शमीने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या, तर रवींद्र जडेजाला ४ विकेट आणि अश्विनला १ विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेकडून दहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या पीडिटने सर्वाधिक ५६ रन केले. दोन्ही इनिंगमध्ये शतक करणाऱ्या रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाचव्या दिवसाची सुरुवात ११/१ अशी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला पाचव्या दिवसाच्या सुरुवातीपासून धक्के लागले. या धक्क्यातून त्यांना सावरता आलं नाही आणि भारताने ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १-०ने आघाडी घेतली.


पहिल्या टेस्टमध्ये भारताने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि पहिल्या इनिंगमध्ये ५०२/७वर डाव घोषित केला. मयंक अग्रवालने द्विशतक झळकावलं तर रोहितनेही शतकी खेळी केली. यानंतर बॅटिंगला आलेल्या दक्षिण आफ्रिकेची टीम ४३१ रनवर ऑलआऊट झाली. डीन एल्गार आणि क्विंटन डिकॉकच्या शतकामुळे आफ्रिकेला एवढी मजल मारता आली. तरी भारताला ७१ रनची आघाडी मिळाली.


दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने ३२३/४ वर डाव घोषित केला. रोहित शर्माने पुन्हा एकदा शतक करून भारताला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं. ज्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला ३९५ रनचं आव्हान दिलं.


भारताचा घरच्या मैदानातला हा सलग ११वा टेस्ट विजय आहे. या विजयाबरोबरच भारताने ऑस्ट्रेलियाचा विजयाचा विक्रम मोडला आहे.