Rahul Dravid: सध्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडत आहेत. भारतीय खेळाडू या स्पर्धेत जिवाची बाजी लावून खेळतायेत. तर नेमबाजपट्टू मनू भाकरने पहिलं पदक पटकावून खातं देखील उघडलंय. अशातच आता इतर खेळाडूंकडून भारताला डझनभर पदकाच्या अपेक्षा आहेत. दुसरीकडे टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप नाव कोरलं असताना ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पाहिजे होतं रावं.. अशा गप्पा ऐकायला मिळतात. परंतू तुम्हाला माहिती नसेल तर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश देखील होणार आहे. 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. अशातच आता टीम इंडियाचे माजी कोच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यानंतर राहुल द्रविड पॅरिसमध्ये ऑलिम्पिक सामने पाहण्यासाठी रवाना झाले. त्यावेळी 'ऑलिम्पिकमधील क्रिकेट: नवीन युगाची सुरुवात' या विषयावरील पॅनल चर्चेत द्रविड यांनी सहभाग नोंदवला होता. त्यावेळी त्यांनी आपलं मत स्पष्टपणे मांडलं.


काय म्हणाला राहुल द्रविड?


ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या संदर्भात मी ड्रेसिंग रुममध्ये अनेक चर्चा ऐकलेल्या आहेत. 2026 मध्ये होणारा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप असो वा 2028 ची ऑलिम्पिक स्पर्धा, सर्वत्र याचीच चर्चा मी ऐकली. 2027 च्या वर्ल्ड कप विषयी देखील लोक बोलतात. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट असेल असंही मी ऐकलं होतं. मला वाटतं की हे सकारात्मक पाऊल आहे, असंही द्रविड यांनी यावेळी म्हटलं.


क्रिकेटर्सला देखील सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा असते. त्यांना देखील पोडियमवर उभं रहायचं असतं. खेड्यापाड्यातून क्रिकेटर तयार होतील. मला विश्वास आहे की खेळाडू देखील यासाठी पूर्ण तयारी करतील आणि ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जीव लावून मेहनत करतील आणि नक्कीच 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचे पुरूष आणि महिला संघ सूवर्णपद पटकावतील, असा विश्वास देखील राहुल द्रविड व्यक्त केला.



दरम्यान, अनेक भारतीय चाहते लॉस एंजेलिसमध्ये येऊन क्रिकेटला सपोर्ट करू शकतील आणि उर्वरित जगाला क्रिकेट किती मोठा आणि महान खेळ आहे हे दाखवू शकतील, असंही द्रविडने म्हटलं आहे. पण दुर्देवाने मी खेळू शकणार नाही. पण सपोर्ट करण्यासाठी मी नक्कीच तिथं असेल, असंही द्रविड यांनी प्रामाणिकपणे सांगितलं.


ऑलिम्पिक समितीने 2028 साली होणाऱ्या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता तब्बल 123 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे सामने होणार आहेत. 1900 मध्ये शेवटचा सामना खेळवला गेला होता. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये स्क्वॅश, बेसबॉल/सॉफ्टबॉल, लॅक्रोस, क्रिकेट आणि फ्लॅग फुटबॉल यांचा समावेश होणार आहे. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी या सर्व खेळाचं स्वागत केलं आणि विराट कोहलीचा उल्लेख केला होता. त्यामुळे विराट कोहलीमुळे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार का? असा सवाल विचारला जात होता.