Team India: टी-20 वर्ल्डकपनंतर टीम इंडिया `फुल बिझी`, BCCI ने वेळापत्रक केलं जाहीर
Team India Schedule: टीम इंडिया 2024 यावर्षी न्यूझीलंड आणि 2025 च्या सुरुवातीला इंग्लंडचे यजमानपद भूषवणार आहे. या देशांतर्गत सिझनमध्ये भारताला 5 टेस्ट सामने, 3 वनडे सामने आणि 8 टी-20 सामने खेळावे लागणार आहेत.
Team India Schedule: सध्या टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप खेळतेय. वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचं भारतात कसं शेड्यूल असणार आहे, याची माहिती भारतीय क्रिकेट बोर्डाने दिली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2024-2025 देशांतर्गत हंगामासाठी टीम इंडियाचे शेड्यूल जाहीर केलं आहे. भारताच्या देशांतर्गत सिझनची सुरुवात सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या 2 टेस्ट सामन्यांच्या सिरीजने होणार आहे. यावेळी टीम इंडियाला याच टीमसोबत 3 टी-20 सामनेही खेळावे लागणार आहे.
यानंतर टीम इंडिया 2024 यावर्षी न्यूझीलंड आणि 2025 च्या सुरुवातीला इंग्लंडचे यजमानपद भूषवणार आहे. या देशांतर्गत सिझनमध्ये भारताला 5 टेस्ट सामने, 3 वनडे सामने आणि 8 टी-20 सामने खेळावे लागणार आहेत. त्यामुळे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचं शेड्यूल बिझी असणार आहे.
3 देशांचं यजमानपद भूषवणार भारत
बांगलादेश
टीम इंडिया पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यांत बांगलादेशाचं यजमानपद भूषवणार आहे. हा दौरा 19 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई आणि कानपूर या ठिकाणी 2 टेस्ट सामने होणार आहेत. यानंतर 6 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दोन्ही टीम 3 टी-20 सामन्यांसाठी आमनेसामने येणार आहेत. हे 3 टी-20 सामने अनुक्रमे धर्मशाला, दिल्ली आणि हैदराबादमध्ये आयोजित केले जाणार आहेत.
न्यूझीलंड
बांगलादेशविरुद्धची सिरीज संपल्यानंतर 4 दिवसांनी टीम इंडिया न्यूझीलंडसोबत 3 टेस्ट सामन्यांच्या सिरीजला सुरुवात करणार आहे. न्यूझीलंडची टीम 16 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत भारतासोबत 3 टेस्ट सामने खेळणार आहे. पहिला सामना बंगळुरूमध्ये, दुसरा पुण्यात आणि तिसरा टेस्ट सामना मुंबईत होणार आहे.
इंग्लंड
नवीन वर्षात म्हणजेच 2025 मध्ये भारतासमोर पहिलं आव्हान इंग्लंडचे असणार आहे. इंग्लंडचा भारत दौरा 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 12 फेब्रुवारीला हा दौरा संपणार आहे. सुमारे 3 आठवड्यांमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 5 टी-20 आणि 3 वनडे सामने खेळवले जाणार आहे. या आठही सामन्यांचे यजमानपद आठ वेगवेगळ्या मैदानांवर सोपवण्यात आल्याची माहिती आहे.
वर्ल्डकपनंतर टीम इंडिया झिम्बाब्वेशी भिडणार
या देशांतर्गत सिझनला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडिया झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. T20 वर्ल्डकप 2024 संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी भारतीय टीम झिम्बाब्वेला भेट देणार आहे. 6 जुलै ते 14 जुलै दरम्यान दोन्ही टीममध्ये 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. या सिरीजसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह टीममधील इतर वरिष्ठ खेळडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.