मुंबई : टीम इंडियाच्या जर्सीवर असलेला स्पॉन्सर बदलणार आहे. ऑपोऐवजी आता टीम इंडियाच्या जर्सीवर बायजू हे नाव दिसणार आहे. बायजू ही बंगळुरूमधील ऑनलाईन शैक्षणिक संस्था आहे. ऑपोने त्यांचे स्पॉन्सरशीपचे अधिकार बायजूला दिले. २०१७ साली बीसीसीआय आणि ऑपो यांच्यात ५ वर्षासाठी १,०७९ कोटी रुपयांचा करार झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया बायजू स्पॉन्सर असलेली ही नवी जर्सी दक्षिण आफ्रिका सीरिजपासून घालणार आहे. १५ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे.


स्पॉन्सरशीप हस्तांतरणाचा हा करार बीसीसीआय, ऑपो आणि बायजू यांच्यामध्ये झाला आहे. मार्च २०१७ मध्ये ऑपोने लिलावात व्हिव्होचा पराभव केला होता. या करारानुसार ऑपो बीसीसीआयला प्रत्येक मॅचसाठी ४.६१ कोटी रुपये आणि आयसीसी स्पर्धांच्या प्रत्येक सामन्यासाठी १.५६ कोटी रुपये देत होते.


ऑपो आणि बायजू यांच्या करार हस्तांतरणामध्ये बीसीसीआयला कोणतंही आर्थिक नुकसान होणार नाही. पण गोपिनियतेच्या मुद्द्यामुळे या दोन्ही कंपन्यांमध्ये किती व्यवहार झाला याची माहिती देण्यात आलेली नाही.


बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या व्यवहारामुळे बीसीसीआयचा आणखी फायदा होऊ शकतो. या दोन्ही कंपन्यांकडून बीसीसीआयला १० टक्के रक्कम मिळू शकते. ही रक्कम कोण देणार हे ऑपो आणि बायजू यांच्यात ठरवलं जाईल.