Sport News : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या मॅचमध्ये आफ्रिकेने भारताचा पराभव केला आहे. भारताच्या 134 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेने 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. एडन मार्क्रम आणि डेव्हिड मिलरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने 134 धावांचा टप्पा पूर्ण केला. वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा विजयरथ आफ्रिकेने रोखला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताची सुरूवात निराशाजनक झाली, आफ्रिकेच्या वेन पार्नेलने पहिलं षटक तर निर्धाव टाकलं. आफ्रिकेच्या फलंदाजांनी सुरूवातीपासूनच दबाव केला होता. सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा 15 धावा, के.एल. राहुलला 9 धावा आणि विराट कोहलीला 12 धावांवर लुंगी एनगिडीने बाद करत भारताला बॅकफूटवर ढकललं. 


आजच्या सामन्यात अक्षर पटेलच्या जागी दीपक हुड्डाला संधी देण्यात आली होती. मात्र त्यालाही फारशी चमक दाखवता आली नाही.  दीपकला नॉर्खियाने बाद करत भारताला चौथा धक्का दिला. तर दुसरीकडे सूर्य कुमारने एक बाजू लावून धरली होती. वैयक्तिक अर्धशतक करत सूर्याने भारताला 100 धावांचा आकडा पार करून दिला. आज दिनेश कार्तिकही फार काही करू शकला नाही, अवघ्या 6 धावांवर त्याला एनगिडीने बाद केलं. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक 4 तर वेन पार्नेलने 3 आणि नॉर्खियाने 1 गडी बाद केला. आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी 134 धावांचं आव्हान होतं.


लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचीही सुरूवात एकदम खराब झाली. अर्शदीप सिंहने (Arshadeep Singh) मोठे धक्के दिले, आफ्रिकेच्या दोन महत्वपुर्ण विकेट त्याने घेतल्या.  पहिल्याच चेंडूवर क्विंटन डी कॉकला बाद केले, त्यानंतर रिले रोसोला बाद केले. ओव्हरमध्ये दोन महत्वपुर्ण विकेट घेतल्या. भारत या सामन्यामध्ये मुसंडी मारणार असं वाटत होतं मात्र एडन मार्क्रम आणि डेव्हिड मिलरच्या अर्धशतकाने सामना आफ्रिकेच्या पारड्यामध्ये झुकला.


आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक नाबाद 59 धावा केल्या. मार्क्रम बाद झाल्यावर सामन्यामध्ये ट्विस्ट आला होता मात्र मिलरने शेवटपर्यंत थांबत विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह आफ्रिकेने पॉंइंट्स टेबलमध्ये 5 गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसऱ्या स्थानावर 4 गुणांसह भारत आणि बांगलादेश आहेत. आता भारताला येणाऱ्या सामन्यांमध्ये विजयाची गरज आहे.