मुंबई : T20 वर्ल्ड 2021 मध्ये भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. यामुळे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया सेमीफायनल फेरीत पोहोचू शकली नाही. 8 नोव्हेंबरला टीम इंडियाने नामिबियाविरुद्धचा सामना जिंकून स्पर्धेला अलविदा केलं. दरम्यान तो सामना रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना ठरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर दोनदा कसोटी मालिका जिंकली. याशिवाय त्यांच्या हाताखाली टीम इंडियाने अनेक यश मिळवलं. मात्र, शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाखाली टीम इंडियाला एकदाही आयसीसी ट्रॉफीवर कब्जा करता आला नाही, ज्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. 


आता रवी शास्त्री यांनी आयसीसी टूर्नामेंट न जिंकण्याबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. आयसीसीचे जेतेपद न जिंकल्याने निराशा नक्कीच झाली आहे, पण खेद वाटत नाही, असं शास्त्री स्पष्ट केलं आहे. तसंच, ऑस्ट्रेलियात सलग दोन वेळा कसोटी मालिका जिंकणं हे रवी शास्त्री आपले सर्वात मोठे यश मानतात.


एका बेवसाईटशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, "माझा आणि माझ्या टीमचा पाच वर्षांचा प्रवास ज्या प्रकारे झाला आहे, त्याबद्दल खेद वाटत नाही. या काळात आम्ही खूप काही साध्य केलं. ऑस्ट्रेलियात जिंकणं ही मोठी कामगिरी होती, त्याला तुम्ही विसरू शकत नाही. तब्बल 70 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात सलग दोन विजय, ही गोष्ट अकल्पनीय होती. आणि अर्थातच इंग्लंडमधील मालिकेत आघाडी मिळवणंही विशेष होतं."


आयसीसी स्पर्धा न जिंकण्याबाबत शास्त्री म्हणाले, "ही निराशा आहे, मात्र खेद नाही. कदाचित आम्ही एक नाही तर दोन स्पर्धा जिंकू शकलो असतो, पण अशा गोष्टी घडतात. तुमची सुरुवात चांगली झाली नाही, तर तुम्ही मागे पडू लागता, जसं या वर्ल्डकप घडलं."


दरम्यान विराट कोहली टी-20 संघापाठोपाठ एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही सोडण्याचा विचार करू शकेल, असं मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ मागील पाच वर्षे कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढणं शक्य नाही. तसंच कसोटी संघाचे दीर्घकाळ नेतृत्व करता यावं यासाठी तो एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडू शकेल, असंही शास्त्री म्हणालेत.