दक्षिण आफ्रिकेत ही चूक भारताला महागात पडणार
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजनंतर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना होईल.
मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजनंतर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना होईल. यंदाच्या वर्षामध्ये भारतीय टीमनं सगळ्या सीरिज जिंकत विक्रमाला गवसणी घातली. घरच्या मैदानावर भारतीय संघ अजिंक्य राहिला पण आता परदेशातही या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान भारतापुढे असणार आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकही टेस्ट सीरिज जिंकला नाही. पण सध्या भारतीय संघात आफ्रिकेला मात देणारे चांगले फास्ट बॉलर्स आहेत. पण दक्षिण आफ्रिकेत यश मिळवायचं असेल तर भारतीय खेळाडूंना त्यांच्या कमजोरीवर लवकर मात करावी लागेल.
ही आहे भारतीय संघाची कमजोरी
भारतीय संघाची स्लिपमधली फिल्डिंग ही सध्याची सगळ्यात मोठी कमजोरी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही भारतानं स्लिपमधले अनेक कॅच सोडले. शिखर धवन आणि विराट कोहली यांनीही स्लिपमध्ये कॅच सोडले.
स्लिपमध्ये सर्वोत्तम न्यूझीलंड
स्लिपमध्ये फिल्डिंग करणाऱ्या संघांमध्ये न्यूझीलंड सर्वोत्तम आहे. मागच्या ५ वर्षांमधल्या २३३ टेस्ट मॅचमधून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या ५ वर्षात ५० पेक्षा जास्त टेस्ट खेळणाऱ्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. तर या यादीमध्ये भारत शेवटून दुसरा आहे.
सगळ्यात जास्त कॅच सोडणाऱ्या संघामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर स्लिपमध्ये सर्वाधिक वाईट कामगिरी करणारा संघ वेस्ट इंडिजचा आहे.
का सुटतात भारतीय संघाचे कॅच
प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्यामुळे भारतीय संघ स्लिपमध्ये कॅच सोडत असल्याचं मत भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं व्यक्त केलं आहे. स्लिपमध्ये फिल्डिंग करत असणाऱ्या खेळाडूंचे हात मऊ असले पाहिजेत. पण खेळाडू जास्त व्यायाम करतात आणि त्यांचे हात कडक होतात, म्हणून कॅच सुटतात असं सेहवाग म्हणाला आहे.
राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मणसारखे खेळाडू आधी भारतीय संघात होते. त्यांनी स्लिपमध्ये सर्वोत्तम फिल्डिंग केली कारण त्यांचे हात मऊ होते, अशी प्रतिक्रिया सेहवागनं दिली आहे.
संघ | कॅच सोडण्याची टक्केवारी |
वेस्ट इंडिज | ३८ टक्के |
भारत | ३६.२ टक्के |
श्रीलंका | ३१ टक्के |
इंग्लंड | ३० टक्के |
पाकिस्तान | २७ टक्के |
ऑस्ट्रेलिया | २४ टक्के |
दक्षिण आफ्रिका | २३.२ टक्के |
न्यूझीलंड | २२.२ टक्के |