कानपूर : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा अनिर्णित राहिला. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला सामना अनिर्णित ठेवण्यात न्यूझीलंडला यश आलं. न्यूझीलंडची 89.2 ओव्हरमध्ये 9 बाद 155 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र अझाज पटेल आणि रचीन रवींद्र या जोडीने 10 व्या विकेटसाठी 5 व्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 52 चेंडूत 10 धावांची चिवट भागीदारी केली आणि टीम इंडियाचा तोडांशी आलेला विजय हिरावून घेतला. भारताला विजय मिळवता आला नाही. मात्र हंगामी कर्णधार अंजिक्य रहाणेने त्याची विक्रमी वाटचालीत खंड पडू दिला नाही. (Team India never lost test match in Ajinkya Rahane captaincy see statistics)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे विक्रम?


रहाणेने आतापर्यंत त्याच्या नेतृत्वात एकही सामना गमावलेला नाही. न्यूझीलंड विरुद्धची पहिला कसोटी सामना हा रहाणेचा कर्णधार म्हणून 6 वा सामना होता. रहाणेने आपल्या नेतृत्वात 6 पैकी 4 सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. तर उर्वरित 2 सामने हे अनिर्णित राहिले आहेत. 


या विजयामध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील गाबामधील ऐतिहासिक विजयाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या 4 विजयांपैकी 3 विजय हे चक्क ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळवले आहेत. तर उर्वरित एक सामन्यात अफगाणिस्तानवर मात केली होती. 


नेतृत्वाची सुरुवात केव्हापासून? 


अजिंक्यला विराटच्या अनुपस्थितीत 2017 मध्ये पहिल्यांदा कसोटीत नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवण्यात आला होता. या सामन्यात कांगारुना पराभूत करत रहाणेने विजयी सुरुवात केली होती. यानंतर अफगाणिस्तानचा एक डाव आणि 262 धावांनी पराभव केला होता. 


जानेवारी महिन्यात टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत कॅप्टन्सीची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात नेतृत्व करुन विराट मायदेशी परतला. यामुळे ही संधी मिळाली. अजिंक्यने दुसऱ्या सामन्यात कांगारुंना पाणी पाजलं. तिसरा सामना अनिर्णित राखला. तर चौथा सामन्यात शानदार विजय मिळवला होता. या विजयासह टीम इंडियाने रहाणेच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती. 


दरम्यान या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे 3 ते 7 डिसेंबरला करण्यात आलं आहे. या सामन्यात विराट नेतृत्व करणार आहे.