नवी दिल्ली : टीम इंडियाला दक्षिण आफ्रिके दौ-याआधी एक मोठा दणका बसला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी आणि कर्णधाराने तक्रार केली होती की, त्यांना या दौ-याच्या तयारीसाठी वेळच मिळाला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दौ-यात टेस्ट सीरिजआधी टीमला तयारीसाठी एकच सराव सामना मिळाला होता. मात्र आता अशी माहिती समोर येतीये की, टीमला मिळालेला हा एक सराव सामनाही रद्द करण्यात आला आहे. याचा अर्थ टीम इंडियाला आता थेट टेस्ट सीरिजमध्ये उतरावं लागणार आहे. 


दोन दिवसीय सराव सामना रद्द


दक्षिण आफ्रिके विरुद्ध तीन टेस्ट सामन्यांच्या सीरिजआधी भारताचा दोन दिवसीय अभ्यास सामना रद्द करण्यात आला आहे. सीएसएनुसार, सराव सामन्याच्याऎवजी भारतीयांनी या दिवसांमध्ये ट्रेनिंगचा पर्याय निवडला आहे. सीएसए म्हणाले की, ‘भारताचा यूरोलक्स बोलॅंड पार्कमध्ये होणारा दोन दिवसीय सराव सामना आता होणार नाहीये. टीम इंडियाने या दिवसात ट्रेनिंग सत्र करण्याचा निर्णय घेतला आहे’.


कोणतही कारण नाही


सराव सामना रद्द करण्यासाठी कोणतही अधिकृत कारण देण्यात आलेलं नाहीये. पण याचा अर्थ असा झाला की, टीम इंडिया पुढील पाच जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरू होत असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये कोणताही सराव सामना न खेळता उतरणार आहे. 


नवी गोलंदाजांना संधी


बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-यांनी पीटीआयला माहिती दिली की, मोहम्मद सिराज, आवेश खान, नवदीप सैनी आणि बासिल थंपी नेट गोलंदाजाच्या रूपाने टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका जाणार आहे. याच्यामागे हा विचार आहे की, यामुळे पाहुण्या टीमच्या फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजां विरूद्ध चांगली तयारी करण्यास मदत मिळेल. 


सर्वच सामन्यांच्या वेळात बदल


सर्व डे-नाईट वनडे सामन्यांच्या वेळातही बदल करण्यात आला आहे. आता सर्वच सामने अर्धा तास आधी सुरू होणार आहे. आधी हा सामना द. आफ्रिकेच्या वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होणार होता. पण आता हा सामना १ वाजता सुरू होईल. पहिला, तिसरा, चौथा आणि सहावा वनडेचा वेळ बदलण्यात आला आहे तर दुसरा वनडे सामना दीड वाजता सुरू होणार आहे.