मुंबई : टीम इंडियाच्या सुपर फॅन असलेल्या चारुलता पटेल यांचं निधन झालं आहे. त्या ८७ वर्षांच्या होत्या. मागच्यावर्षी वर्ल्ड कपदरम्यान भारत-बांगलादेश मॅचवेळी चारुलता पटेल प्रकाशझोतात आल्या होत्या. स्टेडियममध्ये चारुलता पटेल गळ्यात तिरंग्याचा स्कार्फ, हातात तिरंगा आणि व्हूव्हूझेला वाजवून जोरदार सेलिब्रेशन करत होत्या. व्हीलचेअरवर मॅच बघायला आलेल्या चारुलता पटेल यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. लाईव्ह मॅचदरम्यान चारुलता पटेल यांचा उत्साह कैद करण्याचा मोह कॅमेरामनलाही आवरला नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅच संपल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी जाऊन चारुलता पटेल यांची भेट घेतली आणि त्यांचे आशिवार्द मागितले. तसंच विराटने वर्ल्ड कपमधल्या पुढच्या श्रीलंकेविरुद्धच्या मॅचचं तिकीट आपण चारुलता पटेल यांना देऊ असं आश्वासन विराटने दिलं होतं. विराटने हे आश्वासन पाळलं आणि श्रीलंकेविरुद्धच्या मॅचसाठी चारुलता पटेल स्टेडियममध्ये उपस्थित होत्या.





चारुलता पटेल यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचा मृत्यू झाल्याची पोस्ट करण्यात आली आहे. १३ तारखेला संध्याकाळी ५.३० वाजता चारुलता पटेल यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या वर्षी विराट कोहली आणि रोहित शर्माला भेटणं हे त्यांच्यासाठी आयुष्यातला सगळ्या मोठा दिवस होता. अनेकवेळा चारुलता पटेल यांनी आम्हाला हे सांगितलं, असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.