मुंबई : कर्णधार विराट कोहली याची दमदार फलंदाजी आणि भुवनेश्वर कुमार याने बाद केलेल्या विरोधी संघाच्या चार गडींच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडिजसोबतच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळाला. पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला. पण, सामन्यावर याचे फारसे परिणाम झाले नाहीत. अखेर विराटच्या यंग ब्रिगेडने हा सामना ५९ धावांनी जिंकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फलंदाजी करत या सामन्यात भारताने ७ गडी बाद २९७ धावा केल्या. कर्णधारपद भूषवणाऱा आणि आपल्या कारकिर्दीत आणखी एका शतकाची जोड देणारा विराट कोहली याला सामनावीर घोषित करण्यात आलं. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हे ४२ वं शतच आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, याच्या शतकांच्या विक्रमापासून तो आता ४९ शतकं दूर आहे. 


पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओवल मैदानात खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराटसोबतच श्रेयस अय्यर यानेही ७१ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. ज्यानंतर भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मैदानात आलेल्या वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी सुरु असताना पावसाचा व्यत्यय़ आला. अखेर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे सामना जिंकण्यासाठी विंडिजला ४६ षटकांमध्ये २७० धावांचं निर्धारित लक्ष्य देण्यात आलं. पण, यजमान मात्र या धावांचा पाठलाग करताना ४२ धावांमध्येच सर्वबाद २१० धावा करत तंबूत परतले. दरम्यान, या सामन्यात अवघ्या ११ धावांवर बाद होणाऱ्या ख्रिस गेल याने एका विक्रमावर त्याचं नाव कोरलं. आपल्या देशासाठी एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम असून, या बाबतीच त्याने ब्रायन लारालाही मागे टाकलं आहे. 


भारताचे सलामीवीर अपयशीच


विरोधी संघाच्या खेळाविषयी बोलताना भारतीय संघातील सलामीवीर जोडीसुद्धा फारशी प्रभावी खेळाचं प्रदर्शन करु शकली नाही. पहिल्याच षटकात शिखर धवन अवघ्या २ धावा करून बाद झाला. ज्यानंतर विराट कोहलीने  रोहित शर्माच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागिदारी केली. रोहितने ३४ चेंडूंमध्ये अवघ्या १८ धावा केल्या आणि त्यानेही परतीची वाट धरली. ऋषभ पंतही या सामन्यात बऱ्याच अंशी अपयशी ठरला.