केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू टेंबा बऊमाने वर्णद्वेषाबाबतची उद्विगनता बोलून दाखवली आहे. अनेकवेळा त्वचेच्या रंगाने बघितल्या गेल्यामुळे कारकिर्दीवर प्रभाव पडतो, अशी खंत बऊमाने बोलून दाखवली आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये ७ विकेटने विजय मिळवला. या मॅचमध्ये बऊमाने ९८ रनची खेळी केली. या मॅचमध्ये क्विंटन डिकॉकने शतकी खेळी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'या गोष्टी खूप कठीण आहेत. टीमबाहेर जाण्याबाबत काही नाही. प्रत्येक खेळाडू हा टीमबाहेर जातो. प्रत्येकाला या काळातून जावं लागतं. खेळाडूंच्या रन बनत नाहीत. पण जेव्हा ते परिवर्तनाच्या गोष्टी करतात, तेव्हा अडचणी येतात,' असं बऊमा म्हणाला.


'मी अश्वेत आहे आणि हा माझ्या त्वचेचा रंग आहे. पण मी क्रिकेट खेळतो, कारण मला हा खेळ आवडतो. मी टीममध्ये आहे, कारण मी स्वत:च्या हिमतीवर आपल्या टीमला पुढे घेऊन गेलो आहे,' अशी प्रतिक्रिया बऊमाने दिली आहे.


दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये एकूण ६ खेळाडूंची निवड आरक्षणातून होते. यातले २ खेळाडू हे कृष्णवर्णीय तर उरलेले ४ खेळाडू हे गहूवर्णीय असतात. टेंबा बऊमा हा दक्षिण आफ्रिकेच्या या नितीमुळे टीममध्ये असल्याची टीका सोशल मीडियावर करण्यात आली होती. या टीकेलाच बऊमाने उत्तर दिलं आहे.


'इथली लोकं तुम्हाला परिवर्तनाच्या नजरेतून बघतात. जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता, तेव्हा परिवर्तनाबद्दल बोललं जात नाही, याबाबत माझा गंभीर आक्षेप आहे. आपल्याला चांगल्याला वाईटाबरोबर घ्यायची सवय झाली आहे. जर एखादा अश्वेत खेळाडू चांगली कामगिरी करत नसेल तर परिवर्तन योग्य नाही, पण जेव्हा तो चांगली कामगिरी करतो, तेव्हा हे ठीक असतं,' असं परखड मत टेंबा बऊमाने मांडलं.