Neeraj Chopra : `माझ्यासाठी स्वप्नपूर्ती...`, रोजर फेडररला भेटल्यावर काय बोलला नीरज चोप्रा?
Neeraj Chopra On Roger Federer : फेडररने चोप्राला त्याचे ऑटोग्राफ केलेलं टेनिस रॅकेट दिलं, तर भारतीय भालाफेक खेळाडूने माजी जागतिक नंबर वन टेनिसपटूला ऑटोग्राफ केलेली एशियन गेम्स जर्सी भेट दिली.
Neeraj Chopra met with Roger Federer : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिंम्पिक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) नुकताच स्विझर्लंडमध्ये गेला होता. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी तो स्विझर्लंडला गेला होता. तुम्हाला माहिती नसेल तर, नीरज चोप्रा हा स्वित्झर्लंडचा टुरिझम एम्बेसडर आहे. त्याचबरोबर 20 वेळा ग्रँड स्लॅम पटकावणारा रोजर फेडरर देखील स्वित्झर्लंडचा टुरिझम एम्बेसडर आहे. अशातच या दोन दिग्ग्जांची भेट झाली. या भेटीनंतर नीरजने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाला नीरज चोप्रा?
आज ज्या गोष्टीने मला सर्वात जास्त प्रेरणा दिली ती म्हणजे त्याची नम्रता आणि त्याचं नैसर्गिक आकर्षण... ज्याने मला त्याच्याशी सहजतेनं बोलावं वाटलं. आमच्या संबंधित आवडी आणि मैदानावरील आणि मैदानाबाहेरील जीवनातील अनुभवांबद्दलची देवाणघेवाण करण्यात आम्हाला खूप चांगला वेळ मिळाला, अशा भावना नीरजने व्यक्त केल्या आहेत.
रॉजर फेडररला झुरिचमध्ये भेटणं हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देण्याच्या त्याच्या कौशल्याची, खिलाडूवृत्तीची आणि क्षमतेची मी नेहमीच प्रशंसा केली. आज त्यांच्या नम्रतेनं मला प्रेरणा दिली, त्यामुळे त्यांच्यासारख्या व्यक्तीच्या उपस्थितीमुळे मला खूप आनंद मिळतो, असं नीरज चोप्रा म्हणाला आहे.
फेडररने चोप्राला त्याचे ऑटोग्राफ केलेलं टेनिस रॅकेट दिलं, तर भारतीय भालाफेक खेळाडूने माजी जागतिक नंबर वन टेनिसपटूला ऑटोग्राफ केलेली एशियन गेम्स जर्सी भेट दिली. त्याचे फोटो नीरज चोप्राने शेअर केले आहेत. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने भारताचे दुसरं वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलं होतं. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची त्याला आशा आहे.
दरम्यान, भारताने जागतिक पातळीवरील अॅथलेटिक्स स्पर्धाचे आयोजन करणे गरजेचं आहे, अशी भावना नीरज चोप्रा याने व्यक्त केली होती.