कानपूर : भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत असून कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकल्यानंतर भारतीय टीम प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. दरम्यान अजिंक्य रहाणेचा कसोटी सामन्यातील फॉर्म चिंताजनक आहे, अशा स्थितीत सतत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची उत्तरं खुद्द कर्णधारानेच दिलीयेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजिंक्य रहाणे म्हणतो की, त्याला त्याच्या फॉर्मची चिंता नाही, कारण प्रत्येक सामन्यात 100 धावा करणं आवश्यक नसतं.


कानपूर कसोटीपूर्वी अजिंक्य रहाणे म्हणाला, "मला फॉर्मची चिंता नाही, माझं काम संघाला शक्य तितकी मदत करणं आहे. याचा अर्थ असा नाही की, प्रत्येक सामन्यात सेंच्यूरी केली पाहिजेत. 30, 40 आणि 50चा स्कोअर देखील खूप महत्वाचा आहे."


अजिंक्य रहाणेची गेल्या 11 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 19ची सरासरी आहे. त्यामुळेच त्याच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत. मात्र या प्रश्नांना कर्णधार रहाणेने सडेतोड उत्तर दिलं आहे.


अजिंक्य रहाणेने कानपूरमध्ये सांगितलं की, मला भविष्याची चिंता वाटत नाही, कारण मला वर्तमानात जगायचं आहे आणि त्याचा आनंद लुटायचा आहे. मी जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. मी फिल्डींग करत असतानाही माझं लक्ष तिथेच असतं.


अजिंक्य रहाणेशिवाय उपकर्णधार चेतेश्वर पुजाराचा फॉर्मही कायम चिंतेचा विषय आहे. चेतेश्वर पुजारानेही म्हटलंय की, मला फॉर्मची चिंता नाही, सतत धावा होत आहेत, फक्त शतक होत नाहीये.


अजिंक्य रहाणेने शेवटचं कसोटी शतक 2020 मध्ये झळकावलं होतं. त्यावेळी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 112 धावांची इनिंग खेळली. त्यानंतर अजिंक्य रहाणेला कसोटीत केवळ 2 अर्धशतकं झळकावता आली आहेत.


असं असेल प्लेईंग 11


  • शुभमन गिल

  • मयंक अग्रवाल

  • चेतेश्वर पुजारा

  • श्रेयस अय्यर

  • अजिंक्य रहाणे (कर्णधार)

  • ऋद्धिमान साहा (विकेटकीपर)

  • रवींद्र जडेजा

  • अक्षर पटेल

  • आर अश्विन