दुबई : कोरोनाच्या शिरकावामुळे स्थगित करण्यात आलेला आयपीएलचा 14 वा हंगाम (IPL 2021) पुन्हा सुरु होणार आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांना सुरुवात होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात एकूण 31 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर 15 ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (The remaining matches of the 14th season of the IPL 2021 will start on September 19 in Dubai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना 


आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना हा टॉप 2 संघामध्ये अर्थात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना दुबईत खेळवण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातही एकूण 3 स्टेडियममध्येच हे सामने खेळवले जातील. त्यापैकी दुबईमध्ये 13, शारजाहमध्ये 10 तर अबूधाबीत  8 सामने खेळवण्यात येणार आहे. तर फायनल मॅचचे (IPL 2021 Final) आयोजनही दुबईत करण्यात आलंय.
 
स्पर्धेतील साखळी फेरीतील  शेवटचा सामना हा 9 ऑक्टोबरला बंगळुरु विरुद्ध दिल्ली यांच्यात खेळवला जाईल. त्यानंतर पहिला क्वालिफायर सामना हा 10 ऑक्टोबरला पार पडेल. तर दुसरी क्वालिफायर आणि एलिमिनेटर मॅच 11 आणि 13 ऑक्टोबरला पार पडणार आहे. या मोसमातील पहिल्या टप्प्यात एकूण 29 सामन्यांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यांनतर खेळाडूंना कोरोना झाल्याने मोसम स्थगित करावा लागला.


27 दिवसात 31 सामने 


बीसीसीआयने  यूएईत एकूण 27 दिवसांमध्ये 31 सामन्यांचं आयोजन केलंय. यामध्ये 7 डबल हेडर सामन्यांचा समावेश आहे. डबल हेडर म्हणजे एका दिवसात दोन सामने. दिवसातील पहिल्या मॅचला दुपारी  3 वाजून 30  मिनिटांनी सुरुवात होईल. तर संध्याकाळचा सामना नेहमीप्रमाणे 7.30 वाजता सुरु होईल. 



25 सप्टेंबरपासून डबल हेडर


14 व्या मोसमातील पहिली डबल हेडर मॅच 25 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. यामधील पहिली मॅच ही दिल्ली विरुद्ध राजस्थान यांच्यात पार पडेल. तर दुसरी मॅचमध्ये हैदराबाद आणि पंजाब किंग्स आमनेसामने असतील.