संपूर्ण देश माझ्या टीमविरोधात खेळतोय; कोहलीच्या `त्या` कृत्याने उडाली खळबळ
थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापला.
केपटाऊन : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना सध्या केपटाऊनमध्ये खेळला जातोय. दरम्यान तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा विराट कोहली भर मैदानात संतापलेला दिसला. केपटाऊनमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्यात असे काही घडले ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात 21व्या ओव्हरमध्ये थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापला.
21व्या ओव्हरमध्ये रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करत होता. या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर अश्विनने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला एलबीडब्ल्यू आऊट केलं. मैदानात असलेल्या अंपायरने भारताच्या बाजूने निर्णय दिला आणि डीन एल्गरला एलबीडब्ल्यू आऊट दिलं. मात्र यानंतर जे घडलं त्यामुळे संपूर्ण वातावरण तापलं.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने लगेच डीआरएस रिव्ह्यू घेतला. यानंतर, रिप्लेमध्ये बॉल विकेटच्या लाईनवर त्याच्या गुडघ्याच्या खाली लागत असल्याचं दिसतं. सहसा अशा परिस्थितीत फलंदाजाला नॉटआऊट दिलं जात नाही. परंतु बॉल ट्रॅकिंगनुसार, बॉल स्टंपच्या वरून जात होता. त्यामुळे थर्ड अंपायरने डीन एल्गरला नॉटआऊट दिलं.
थर्ड अंपायर यांच्या या निर्णयानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. यावेळी विराटला राग अनावर झाला होता. या घटनेनंतर स्टंप माइकवर येऊन विराट कोहलीने त्याची नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, 'संपूर्ण देश माझ्या टीमविरुद्ध खेळतोय आहे.'
रविचंद्रन अश्विननेही याबद्दल निराशा व्यक्त केली आणि स्टंप माईकवर म्हणाला, 'तुम्ही सुपरस्पोर्ट्स जिंकण्यासाठी अधिक चांगले मार्ग स्वीकारले पाहिजेत.'