नवी दिल्ली : श्रीलंके विरूद्ध तिस-या टेस्ट आणि ३ वनडे साठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा करण्यात आली. सर्वात मोठा बदल हा की विराट कोहली याला वनडे सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्याजागी टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्मावर देण्यात आलीये. तो सध्या टीम इंडियाच्या वनडे टीमचा उपकर्णधार आहे. टेस्ट सीरिजबाबत सांगायचं तर कोलकाता येथील पहिली टेस्ट ड्रॉ झाली. पण नागपूर येथे झालेल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेला मात दिली. आता टीम इंडिया १-० ने आघाडीवर आहे. 


आता तिसरी टेस्ट २ डिसेंबरला दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर खेळली जाणार आहे. तिस-या टेस्टमध्ये विराट कोहली हाच कर्णधार आहे. टीममध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. समोरही तिच श्रीलंकेची कमजोर आणि आत्मविश्वास कमी दिसलेली टीम आहे. अशात मॅनेजमेंटने काही नवीन चेह-यांना संधी दिली असती तर त्यांना अनुभव मिळाला असता. मॅनेजमेंटच्या अशाच काही चुकीच्या निर्णयांमुळे टीम इंडियाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 


- कमजोर टीमसमोर प्रयोग का नाही -


आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंकेच्या टीमची स्थिती सध्या वाईट आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने त्यांना यूएईमध्ये वाईट मात दिली होती. त्याआधी टीम इंडियाने श्रीलंकेमध्ये जाऊन टीमला तिन्ही फॉर्मॅटमध्ये ९-० ने मात दिली होती. त्यामुळे आता निवड समितीकडे ही संधी होती की, श्रीलंकेसारख्या कमजोर टीमसमोर नवीन चेह-यांना खेळवणे. असे केल्याने नवीन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव मिळाला असता. पण मॅनेजमेंटने तिच जुनी टीम मैदानात उतरवली आहे. ही टीम ब-याच काळापासून सतत खेळत आली आहे. इतकेच काय तर कर्णधार विराट कोहली याने स्वत: सततच्या सामन्यांवर आपली नाराजी दर्शवली आहे.


- नव्या खेळाडूंना संधी का नाही ?


टीम इंडिया सध्या चांगलीच फॉर्ममध्ये आहे. पण प्रयोग म्हणून टीमबाबत काहीही केलं जात नाहीये. इतकेच काय तर प्रत्येक सीरिजमध्ये एका नव्या चेह-याला टीममध्ये घेतलं जातं. पण त्यांना योग्य संधीही मिळत नाही. नंतर त्यांना टीममधून बाहेर केलं जातं. शार्दुल ठाकूर, रिषभ पंत, मोहम्मद सिराज आणि श्रेयस अय्यर असेच चेहरे आहेत जे अजूनही योग्य संधीच्या प्रतिक्षेत आहेत. 


- वेगवान पिच -


वेगवान पिचवर टीम इंडियाचे धुरंधर कसे खेळतात याचं उदाहरण कोलकाता येथे झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये बघायला मिळालं. श्रीलंका टीमने टीम इंडियाला केवळ १७२ रन्सवर आऊट केले होते. पण दुस-या इनिंगमध्ये जेव्हा पिच जरा सॉफ्ट झाली तेव्हा टीम इंडिया पुन्हा आपल्या रंगात दिसली. विराटच्या टीमला पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायला आहे. विराट आधीच बोललाय की, त्याला तयारीसाठी हवा तसा वेळ मिळाला नाहीये. अशात दक्षिण आफ्रिकेत पिच क्यूरेटरने तिच जुनी वेगवान आणि कठिण पिच तयार केली तर टीम इंडियाचं काय होईल हे सांगता येणार नाही. 


- प्रत्येकवेळ नवीन चेहरा, १-२ सामन्यातून बाहेरचा रस्ता 


गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार खूप वाढला आहे. प्रत्येक सीरिजआधी जेव्हा टीम इंडियाचा निवड केली जाते तेव्हा एका नव्या चेह-याला संधी दिली जाते. आधी शार्दुल ठाकूर, रिषभ पंत या यादीत होते. नंतर मोहम्मद सिराज, विनय शंकर आणि आता सिद्धार्थ कौल. जर आधीच टीम इंडियात नवीन खेळाडू बसून आहेत तर मग प्रत्येक सीरिजमध्ये एक नवीन चेहरा घेण्याची काय गरज आहे? अशात आधीच टीममध्ये घेण्यात आलेल्या आणि योग्य संधी मिळेल याची अपेक्षा लावून बसलेल्या खेळाडूंवर दबाव का बनवला जात आहे. 


- सतत अश्विन-जडेजाला आराम - 


सतत विश्रांतीच्या नावावर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना वनडे टीममधून बाहेर केलं जातंय. अश्विनच्या बाबतीत हे मान्यही केलं की, त्याचं वय जास्त आहे. पण रविंद्र जडेजा हा तर विराटच्याच वयाचा आहे. हे दोन्ही खेळाडू कमाल दाखवू शकतात. अशात त्यांच्याकडे दुर्लक्ष का होतंय?