मुंबई : वेस्ट इंडिजचा प्रवास टी-20 वर्ल्डकप 2021 मध्ये संपुष्टात आला. अबुधाबीमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा आठ विकेट्सने पराभव केला. या पराभवामुळे कॅरेबियन संघ पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या सुपर-12 टप्प्यासाठी थेट पात्र ठरू शकला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 टप्प्यासाठी थेट पात्रता मिळवण्याचं आठ संघ निश्चित झाले आहेत. या आठ संघांमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.


आयसीसीच्या नियमांनुसार, सध्याच्या T20 वर्ल्डकपमधील सुपर-12 चे आठ संघ पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील. या आठ संघांमध्ये T20 वर्ल्डकप 2021 चे विजेते आणि उपविजेते यांचा समावेश असेल. तसंच, 15 नोव्हेंबरपर्यंत ICC पुरुषांच्या T20I रँकिंगच्या आधारे इतर सहा संघांचाही समावेश केला जाणार आहे. 


शनिवारी झालेल्या सामन्यानंतर इंग्लंड, पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया हे संघ टी-20 क्रमवारीत अव्वल-6 मध्ये राहतील. त्याच वेळी, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा संघ नियोजित कट-ऑफ तारखेपर्यंत टॉप-8 मधून बाहेर पडू शकत नाही.


वेस्ट इंडिजबरोबरच यावर्षी सुपर-12 खेळणारे संघ, श्रीलंका, स्कॉटलंड आणि नामिबिया यांनाही पहिल्या फेरीत पुढील टी-20 विश्वचषकात खेळावे लागणार आहे.