दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या लाजिरवाण्या पराभवाची ५ कारणं
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ७२ रन्सनी पराभव झाला आहे.
केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ७२ रन्सनी पराभव झाला आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची टीम पुढे राहिली तर दुसऱ्या दिवशी हार्दिक पांड्यानं भारताला पुन्हा या मॅचमध्ये आणलं. तिसऱ्या दिवशी पाऊस पडल्यामुळे एकही बॉल टाकला गेला नाही.
चौथ्या दिवसाची सुरुवात ६५/२ अशी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त १३० रन्सवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताला विजयासाठी २०८ रन्सची आवश्यकता होती. पण फिलँडरनं ६ विकेट्स आणि मॉर्कल-रबाडानं प्रत्येकी २ विकेट्स घेऊन भारताचा पराभव केला. या पाच कारणांमुळे या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आहे.
जलद खेळपट्ट्यांवर पोल खोल
घरच्या मैदानामध्ये खोऱ्यानं रन्स काढणाऱ्या भारताच्या दिग्गज बॅट्समननी जलद आणि बॉल स्विंग होणाऱ्या खेळपट्ट्यांवर गुडघे टेकले. पहिल्या इनिंगमध्येच भारताचा स्कोअर ९२/७ असा होता. पण हार्दिक पांड्यानं भुवनेश्वर कुमारसोबत ९९ रन्सची पार्टनरशीप करून भारताचा स्कोअर २०० पर्यंत पोहोचवला. पहिल्या इनिंगमध्येही भारतीय बॅट्समन सपशेल अपयशी ठरले.
कोहली चालला नाही तर सगळे फेल
या मॅचमध्ये सुरुवातीला बॅटिंगला येणाऱ्या एकाही बॅट्समनला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहलीबरोबरच धवन, विजय, रोहित आणि पुजारा स्वस्तात माघारी परतले. परदेशामध्ये मॅच जिंकायची असेल तर वरच्या क्रमांकावर बॅटिंगला येणाऱ्यांना मोठी धावसंख्या उभारावी लागते.
भारतातल्या खेळपट्ट्यांवर खेळायचं नुकसान
मागच्या वर्षभरात भारतीय खेळपट्ट्यांवर खेळायचं नुकसान भारताला दक्षिण आफ्रिकेमध्ये झालं आहे. घरच्या मैदानामध्ये अडचणीच्या खेळपट्ट्या मिळाल्यावर भारतीय टीमनं लोटांगण घातलं. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी सपाट खेळपट्ट्यांची मागणी केली आणि विजय मिळवला. पण याचं नुकसान दक्षिण आफ्रिकेमध्ये झालं आहे.
अजिंक्य रहाणेला बाहेर ठेवणं पडलं महागात?
या मॅचमध्ये अजिंक्य रहाणेला संधी देण्याऐवजी भारतानं फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माला टीममध्ये घेतलं. पण दोन्ही इनिंगमध्ये रोहितनं निराशा केली. परदेशामध्ये अजिंक्य रहाणेचं रेकॉर्ड बघता अजिंक्य रहाणे पुढच्या मॅचमध्ये टीममध्ये कमबॅक करण्याची शक्यता आहे.
डुप्लेसिसची चतुराई
दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन फॅप डुप्लेसिसच्या चतूर कॅप्टनशीपमुळे आफ्रिकेचा विजय सोपा झाला. डेल स्टेन सीरीजमधून बाहेर झाल्यामुळे फक्त ३ बॉलर्सच्या मदतीनंच आफ्रिकेचा विजय झाला. या बॉलरना योग्यवेळी बॉलिंग देऊन डुप्लेसिसनं भारतीय टीमला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.